गावजेवणात अजूनही जातिनिहाय बसतात पंगती ‘अंनिस’चा आरेाप
By Sandeep.bhalerao | Published: April 22, 2023 06:51 PM2023-04-22T18:51:17+5:302023-04-22T18:55:56+5:30
त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला.
नाशिक : गावजेवणात एक पंगत विशिष्ट लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी, तर बहुजनांसाठी वेगळी पंगत बसविली जात असल्याचा आरेाप करीत सामाजिक विषमता निर्माण करणारी ही पद्धत बंद करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तहसीलदार आणि पोलिसांकडे करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टच्या गावजेवणात असा प्रकार घडत असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे दरवर्षी चैत्र किंवा वैशाख महिन्यात जेवणावळीचे आयोजन केले जाते. गावजेवण असल्याने त्र्यंबकेश्वर गावातील सामाजिक स्तरातील जवळपास सर्वच लोक जेवणासाठी येत असतात.
पंगत बसविताना मात्र भेदभाव केला जात असून, एका विशिष्ट जातीचे लोक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्वतंत्रपणे अन्न शिजविले जाते व त्यांची जेवणाची पंगतसुद्धा इतर बहुजन समाजघटकांपासून वेगळी बसविली जाते. महादेवी ट्रस्टकडून भेदाभेद निर्माण करणारा हा प्रकार वर्षांनुवर्षे सुरू असल्याचे ‘अंनिस’च्या निवेदनात म्हटले आहे