त्र्यंबकेश्वर तालुक्यात सीमावर्ती भागातील जंगलात खैराची तस्करीचा डाव वन पथकांनी उधळला

By अझहर शेख | Published: June 21, 2024 03:20 PM2024-06-21T15:20:37+5:302024-06-21T15:22:07+5:30

खैराच्या ओंडक्यांनी भरलेली जीप वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात पाठलाग करून पकडली. जीपमधून 26 ओंडके हस्तगत करण्यात आले आहे.

In Trimbakeshwar taluka, forest teams foiled a plot to smuggle khair in the border forest | त्र्यंबकेश्वर तालुक्यात सीमावर्ती भागातील जंगलात खैराची तस्करीचा डाव वन पथकांनी उधळला

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सीमावर्ती भागातील जंगलात खैराची तस्करीचा डाव वन पथकांनी उधळला

नाशिक : पेठपाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुलपासून पुढे गुजरात सीमेजवळ देवडोंगरा-बाफनविहिर भागातील वनविकास महामंडळाच्या राखीव वनातून खैराच्या झाडांची अवैध कत्तल करून तस्करीचा डाव वनविकासच्या (एफडीसीएम) तीन पथकांची संयुक्त कारवाई करून उधळला. खैराच्या ओंडक्यांनी भरलेली जीप वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात पाठलाग करून पकडली. जीपमधून 26 ओंडके हस्तगत करण्यात आले आहे.

वनविकासच्या राखीव वनक्षेत्रात रायता, बोरीपाडा वनपरिक्षेत्र तसेच फिरते पथक व पेठ मधील वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी संयुक्तपणे गस्तीवर सीमावर्ती भागात वनसंरक्षणासाठी रात्र गस्तीवर होते. यावेळी  रायता वनपरिक्षेत्रातील वनकक्ष क्रमांक 136 बाफनविर बीटामधून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैर झाडांची तोड करून गुजरात राज्यात वाहनाने वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती गस्तीपथकाला मिळाली. तीनही पथकांनी त्यादिशेने मोर्चा वळवून देवडोंगराजवळ महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेला लागून गावलागत सापळा रचला. अवैधरित्या खैर झाडाची तोड करून वाहनामध्ये भरणा करुन तस्करी करत गुजरातच्या दिशेने सुसाट बोलेरो जीप (जी.जे०९ एम८७२६) रात्रीच्या अंधारात येताना नजरेस पडली. वनपथकांनी जीप सरकारी वाहनाने अडविण्यासाठी प्रयत्न केले असता चोर वाटेने चालकाने ती दामटविली.

वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैय्या, सुजित शिंदे , वनपाल संदीप रणमले, अभिजीत कोळी, वनरक्षक धनराज पवार, निलेश पाटील, रोहित पगार, माधव पाडदे, विजय मेहत्रे, मंगेश वाघ, दीपक डफळ, आकाश लोणारे, पोलीस अमलदार सुभाष कराटे, वाहन चालक देविदास बोंबले यांच्या पथकांनी त्या जीपचा पाठलाग सुरू केला. जंगलाच्या रस्त्याने जीप सुसाट नेत आडबाजूला वळणावर उभी करून त्यामधील चालक व तस्कर अंधारात फरार झाले.

वनपथकांनी त्यांची ओळख पटवून वन गुन्ह्यात सहभाग निष्पन्न करत संशयित आरोपी गणेश सखाराम बुधर (रा. काकडपाना ता.त्र्यंबकेश्वर) व शैलेश हिदुले (रा. वडोळी, ता.कपराडा, जि.वलसाड) यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम अंतर्गत वन गुन्हा नोंदविला आहे या दोघांचा संयुक्तरीत्या वनपथके शोध घेत आहेत.

Web Title: In Trimbakeshwar taluka, forest teams foiled a plot to smuggle khair in the border forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.