दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
By संजय पाठक | Published: August 15, 2022 11:34 AM2022-08-15T11:34:52+5:302022-08-15T11:35:04+5:30
गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
नाशिक - राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कोणी नाराज असेल तर पुढील मंत्री मंडळाच्या विस्तारात नाराजी दूर होऊ शकेल असेही त्यांनी सांगितलं तसेच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हे येत्या दोन तीन दिवसात जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकांरांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपा संदर्भातील नाराजीबाबत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी काही मत व्यक्त केलं होतं नंतर मात्र त्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिलं आहे असेही महाजन म्हणाले.
राज्य शासनात काम करण्यासाठी कोणतेही खाते दुय्यम नाही. त्यामुळे भाजपाने चांगले खाते आपल्या मंत्र्यांना दिली. आणि अन्य सहकाऱ्यांना दुय्यम खाते दिले असे म्हणणे चुकीचे आहे असे महाजन म्हणाले. आपल्याला वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले आहे. त्यातही चांगले काम करता येईल. कोणाची काही नाराजी असेल तर पुढील मंत्रिमंडळ विस्तारात ती दूर होईल असेही ते म्हणाले.