सुरगाणा तालुक्यात अवैध मद्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:33 PM2019-01-22T18:33:37+5:302019-01-22T18:36:44+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पेठ, करंजाळी येथील सीमा तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला असता, सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा-राशागावरोड मार्गे येत असलेली तवेरा (क्रमांक जीजे १९, एम ८८४७) अडवून तपासणी केली असता, त्यात दमण निर्मित विदेशी
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात दीव, दमण निर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक सुरूच असून, त्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रयत्न करीत असतानाही मद्य तस्कर मात्र त्यातूनही सहीसलामत सुटका करून घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यात सापळा रचून विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले, परंतु मद्य तस्कर फरार झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पेठ, करंजाळी येथील सीमा तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला असता, सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा-राशागावरोड मार्गे येत असलेली तवेरा (क्रमांक जीजे १९, एम ८८४७) अडवून तपासणी केली असता, त्यात दमण निर्मित विदेशी मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला. पथकाने कारचालक अश्विन केसू गांगोडा यास ताब्यात घेतले. त्याचदरम्यान, उंबरठाण-धरमपूररोडवर उंबरठाण शिवारातून संशयास्पद येणारी स्विफ्ट (क्रमांक जी. जे. ०५, सीएस ९६०८) कार अडविली असता त्यातही मोठ्या प्रमाणात मद्य सापडले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांची कारवाई सुरू असतानाच कारचालक मात्र चकमा देऊन फरार झाला. अधिका-यांनी दोन्ही वाहने जप्त केली असून, जॉन मार्टिन व्हिस्कीचे २८ बॉक्स, इम्पिरीयल ब्लूचे पाच बॉक्स, हायवर्ड बिअरचे १२ बॉक्स असा सुमारे दहा लाखांचा माल ताब्यात घेतला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बी. एन. भुतकर, निरीक्षक एन. एम. खांदवे, दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे, हवालदार लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, महेश सातपुते, सुनीता महाजन यांनी पार पाडली.
(फोटो २२ एक्साईज)