बिटकोत रूग्णांच्या तुलनेत कर्मचारी अपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:43+5:302021-04-04T04:14:43+5:30
नाशिक रोड : महापालिकेच्या नवीन बिटको कोविड रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या, गैरसुविधा, औषध टंचाईमुळे कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ...
नाशिक रोड : महापालिकेच्या नवीन बिटको कोविड रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या, गैरसुविधा, औषध टंचाईमुळे कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असून, त्यातच कोरोना रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अनेक पटींनी वाढल्यामुळे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बिटको कोरोना सेंटरमधील स्वॅब टेस्टिंग लॅब सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याचे समजते. त्यामुळे कोरोनाचा अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. त्यामुळेही रुग्णवाढीला हातभार लागत असल्याचे म्हटले जात आहे. कोरोना सेंटरमध्ये डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. रत्नाकर पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रयत्नरत असले, तरी वेगाने वाढत असलेली रुग्णसंख्या व त्या तुलनेत असलेले कमी कर्मचारी बळ, असुविधा यामुळे त्यांच्यावरही ताण वाढला आहे. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी रुग्णालयाचा सतत दौरा करत आहेत. मात्र, समस्या कायमची सोडविण्यात त्यांना यश आलेले नाही. बिटको रुग्णालयाची क्षमता पाचशेची आहे, ती आता एक हजार करण्यात आली आहे. याठिकाणी सध्या सातशे रुग्ण दाखल आहेत. ऑक्सिजन बेड १४५ होते, त्यात नव्याने ६०ची भर पडली आहे. रुग्णसंख्या वाढूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवलेली नाही. शंभर परिचारिका आणि ४० वॉर्डबॉयची गरज आहे. रुग्णालयातील सर्व मजल्यांवरील कोरोना कक्ष भरल्याने आता रुग्णालयाच्या तळघरातही ऑक्सिजन बेडचा कक्ष सुरु झाला आहे.
चौकट===
गर्दीमुळे लसीकरण केंद्र बंद
गर्दी वाढल्यामुळे येथील कोविड लसीकरण केंद्र बंद करुन नाशिक रोडचा खोले मळा, सिन्नर फाटा व पंचक रुग्णालय येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे. लस टंचाईमुळे नागरिक बिटकोतच येतात. कोरोना रुग्ण बिटकोतच भरती होत आहेत. रुग्णालयात वरच्या मजल्यांवर नियमित स्वच्छता होत नाही. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना जेवण व औषधोपचार वेळेत मिळत नाहीत. रेमिडीसिव्हर इंजेक्शन व अन्य औषधांचाही तुटवडा असून, औषधे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. रुग्णालयात अनेक ठिकाणी बेड व अन्य साहित्य पडून आहे.