फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 03:08 PM2018-07-02T15:08:19+5:302018-07-02T15:10:44+5:30
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील रेंगाळलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले
कळवण (नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील रेंगाळलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
सुयोग गुरुबक्षाणी फ्यूनिक्युलर रोपवेज प्रा. लि. नागपूर या खासगी कंपनी व जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून देशातील पहिलाच फ्यूनिक्युलर ट्रॉली हा प्रकल्प कार्यान्वत झाल्याने त्याचा लाभ भाविकांना घेता येणे शक्य झाले आहे. सरकारच्यावतीने टोल नोटिफिकेशन होऊन गॅझेटमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन व यशदाच्या टीमकडून सुचिवण्यात आलेल्या त्रुटींचीही पूर्तता करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून बीओटी तत्त्वावर फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम नागपूर येथील सुयोग गुरुबक्षाणी प्रा. लि. यांच्यामार्फत सुरू करण्यात आले होते. ३२ कोटींचा प्रकल्प प्रसंगानुरूप ११० कोटींच्या घरात पोहोचला आहे. २१ वर्षांच्या करारावर हा प्रकल्प सरकारने नागपूरच्या मे. सुयोग गुरुबक्षाणी या कंपनीकडे दिला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला आहे. करार संपल्यावर याचे हस्तांतरण श्री सप्तशृंग देवस्थान ट्रस्टकडे करण्यात येणार असल्याची माहिती कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली.पायथ्यापासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत खासगीकरणाच्या माध्यमातून फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत.
तिकीट दर ८० रुपये
जुलै २०११ मध्ये प्रकल्प पूर्णत्वानंतर ४० रु पये प्रतिव्यक्ती दर आकारला जाणार होता. दरवर्षी यात टप्प्याटप्प्याने वाढ होणार होती. प्रकल्प सुरू होण्यास २०१८ उजाडले आहे. त्यामुळे वाढीव किमतीसह ८० रु पये दर आकारला जाईल. ३ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तसेच दिव्यांगांसाठी ४० रु पये दर असेल. ७५ वर्षांवरील वृद्धांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. हा दर येण्या-जाण्याचा असेल. तीन वर्षांच्या आतील बालकांसाठी शुल्क आकारले
जाणार नाही.
ट्रॉलीचे कार्य
फ्यूनिक्युलर ट्रॉली यंत्रणेत एकच रेल्वेमार्ग राहणार आहे. रेल्वेमार्गावर दोन ट्रॉलीज असतील. एक ट्रॉली वर जाण्यासाठी तर दुसरी एक खाली येण्यासाठी. दोन्ही ट्रॉली एकाचवेळी कार्यरत राहणार आहेत. एका ट्रॉलीतून एकाचवेळेस ६० प्रवासी प्रवास करू शकतील एवढी क्षमता आहे. एका तासात वीस ट्रिप होऊ शकतील, त्यानुसार एका तासात बाराशे प्रवासी प्रवास करू शकतील. आपत्कालीन परिस्थितीत
प्रवाशांसाठी रेल्वेरुळाच्या एका बाजूने १.० मी.
रु ंदीच्या पायऱ्या बसवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत काही बिघाड झाल्यास ट्रॉलीला बसवलेल्या विशिष्ट यंत्रणेमुळे ट्रॉली दोन ते पाच मीटरच्या अंतरावरच रु ळांना घट्ट पकडून ठेवेल. मध्येच ट्रॉली थांबल्यावर ट्रॉलीच्या एका बाजूस बसवण्यात येणाºया वॉक-वेचा वापर करून भाविक पायी सहज खाली उतरू शकतात.