‘वेस्ट टू एनर्जी’ या पहिल्या पथदर्शक प्रकल्पाचे नाशिकमध्ये उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:32 PM2017-11-29T17:32:33+5:302017-11-29T17:36:47+5:30

गिरीश महाजन यांची उपस्थिती : पर्यावरणपूरक प्रकल्पांचा चालना देण्याची गरज

 Inaugurating the first pilot project of 'West to Energy' in Nashik | ‘वेस्ट टू एनर्जी’ या पहिल्या पथदर्शक प्रकल्पाचे नाशिकमध्ये उद्घाटन

‘वेस्ट टू एनर्जी’ या पहिल्या पथदर्शक प्रकल्पाचे नाशिकमध्ये उद्घाटन

Next
ठळक मुद्देनद्या-नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे अपरिहार्य महापालिकेला ९९ हजार युनिट वीज दरमहा मोफत मिळणार

नाशिक : नद्या-नाल्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’सारखे पर्यावरणपूरक प्रकल्प प्रत्येक नगरपालिका व महापालिकांमध्ये राबविण्याची गरज आहे. विविध देशांच्या मदतीने आणि भारत व राज्य सरकारतर्फे अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका व भारत-जर्मन सरकारच्या मदतीने उभ्या राहिलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिली.
खतप्रकल्पाजवळ जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार व भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या कच ऱ्यापासून वीज निर्मिती या प्रकल्पाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी होत्या. यावेळी महाजन यांनी सांगितले, महापालिकेने या प्रकल्पासाठी केवळ जमीन दिली आहे. त्या मोबदल्यात महापालिकेला ९९ हजार युनिट वीज दरमहा मोफत मिळणार आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट हा प्रश्न सर्वच नगरपालिका व महापालिकांना भेडसावणारा प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला चालना दिल्याने त्याचे अनेक फायदे शहराला होणार आहेत. भविष्यात या प्रकल्पाची क्षमताही वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. प्रक्रिया न केलेले पाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या सांडपाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी अथवा सिंचनासाठीही त्याचा कसा वापर होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. आपले शहर स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त व्हायचे असेल तर टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून त्यापासून वेस्ट टू एनर्जीसारखे पर्यावरणपूरक प्रकल्प उभे राहिले पाहिजेत. नागरिकांनीही ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून अशा प्रकल्प वाढीसाठी हातभार लावण्याची गरज असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रंजना भानसी यांनीही मनोगत व्यक्त करत प्रकल्पामुळे महापालिकेला ८ लाख रुपयांची वीज मोफत मिळणार असल्याचे सांगितले. शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. जीआयझेडचे जितेंद्र यादव यांनी प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. व्यासपीठावर जीआयझेडचे डर्क वॉल्टर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे, पुष्पा आव्हाड, संगीता जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Inaugurating the first pilot project of 'West to Energy' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.