मालेगाव शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:40 AM2021-02-20T04:40:19+5:302021-02-20T04:40:19+5:30
दाभाडी - शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी व्हावीत. शालेय कामकाजात अध्यापनासाठी पूर्णवेळ मिळावा. दैनंदिन काम पेपरलेस व्हावे यासाठी शिक्षण विभागाचे ...
दाभाडी - शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी व्हावीत. शालेय कामकाजात अध्यापनासाठी पूर्णवेळ मिळावा. दैनंदिन काम पेपरलेस व्हावे यासाठी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई यांनी केले.
शिक्षण विभागातर्फे संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अरूण पाटील, कमळाबाई मोरे, शंकर बोरसे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, गटशिक्षणाधिकारी दिलीप गायकवाड उपस्थित होते. देसाई यांनी हायटेक प्रणाली असतानाही कागदकाम वाढत असल्याने या संकेतस्थळावर मोबाईलवर माहिती देणे सोपे होणार असल्याचे सांगितले. देवरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण विभागाला शुभेच्छा दिल्या. या संकेतस्थळावर तालुक्यातील शिक्षकांनी राबविलेले नवोपक्रम, प्रशासनाची माहिती उपलब्ध असून
मुख्याध्यापक लॉगिन वरून केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर माहिती जाते. केंद्रप्रमुखांनी या माहितीची पडताळणी केल्यावर गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला पाठवता येणार आहे. यामुळे कामकाजात सुटसुटीतपणा येणार आहे. तंत्रस्नेही शिक्षक शेखर ठाकूर व संदीप ठोके यांनी वेबसाईटची संरचना करून विकसित केली आहे. यावेळी विस्तार अधिकारी साहेबराव निकम, आत्माराम अहिरे, नजीर पटेल, केंद्रप्रमुख निंबा निकम, साहेबराव बच्छाव, शिवाजी गुंजाळ, दिलीप जावरे, मोठाभाऊ निकम, शोभा हिरे, सुनंदा पवार उपस्थित होते.
कोट....
जिल्ह्यातील सर्वात मोठा शैक्षणिक गट असल्याने तंत्रज्ञानाने माहिती संकलन करण्याचा प्रयत्न आहे. पेपरलेस कामकाजाने शिक्षकांना अध्यापनास वेळ मिळेल. एकाच क्लिकवर तालुका दिसेल. वेळोवेळी अद्यावत करून नावीन्यता जोपासायची आहे.
- दिलीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, मालेगाव.