नांदगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 05:50 PM2019-12-12T17:50:39+5:302019-12-12T17:51:26+5:30
नांदगाव : गुरुकुल पॉलीटेक्निकमध्ये ४५ व्या नांदगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनविलेली वैज्ञानिक उपकरणे व माहिती मांडण्यात आली आहे. उद्या(दि. १३) पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विद्यादेवी पाटील होत्या.
आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारित आहे. ग्रामीण भागात बुद्धीमत्ता आहे. तिला योग्य वळण देण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हावे. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कल्पनांना जागृत करण्याचे एक साधन आहे, अशा विचारातून त्याकडे बघावे असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. प्रास्तविक एन. जी. ठोके यांनी केले. सुभाष कुटे व रमेश बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागाच्या २० शाळा व माध्यमिक विभागाच्या २० शाळांनी भाग घेतला होता. त्यात सौर उर्जा, धान्य साठवण्याच्या पद्धती, रसायनांचा उपयोग न करता सफाई करण्यासाठी जैविक विघटन होणारा द्रव, अग्नीबाण, प्लास्टिकचा वापर करून डांबरी रस्ता तयार करणे असे अनेक कल्पक प्रकल्प यात ठेवण्यात आले होते. प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी व नागरिक यांनी गर्दी केली होती.
माजी सभापती सुमन निकम, विष्णु निकम, किरण देवरे, पंचायत सदस्य सुभाष कुटे, मधुबाला खिरडकर, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, विस्तार अधिकारी एन. पी. ठोके, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, उपसभापती भाऊसाहेब हिरे, के. बी. सोनवणे, एन. आर. ठाकरे, डी. एस. मांडवडे, पी. एस. बैसाणे, के. पी. सोनवणे, प्राचार्य एन. आर. ठाकरे, प्रा. एस. आर. जैन, सी. डी. अहिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. आर. आर. परदेशी, प्रा. एन. एस. बोरसे यांनी केले. आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.