नाशिकॉन-२०१८’चे उद्घाटन : आधुनिक व प्रगत वैद्यकशास्त्र उपचार पद्धतीवर विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:48 PM2018-06-23T22:48:19+5:302018-06-23T22:50:22+5:30
नाशिक : वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. बालकांचे विविध आजार व समस्यांवरील उपचारपद्धतींमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाची देवाणघेवाण हेच ‘नाशिकॉन-२०१८’चे यश असेल, असे प्रतिपादन ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या बालरोग संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांनी केले.
आधुनिक व प्रगत उपचार पद्धतीवर विचारमंथनाच्या हेतूने ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या राष्टÑीय स्तरावरील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने शहरात दोन दिवसीय ‘नाशिकॉन-२०१८’ विभागीय परिषदेला शनिवारी (दि.२३) हॉटेल एक्स्प्रेस-इनमध्ये प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मालवतकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे, सचिव डॉ. अमोल पवार, रवींद्र सोनवणे, प्रशांत कुटे आदी उपस्थित होते.
महागड्या वैद्यकीय सेवा स्वस्त करण्यासाठी स्वदेशी निर्मित यंत्रांचा वापरावर भर व प्रबोधन, ग्रामीण भागातील कुपोषण व मोबाइल, व्हिडीओ गेम्स, खाद्य सवयी यांचा शहरी भागातील मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासावर होणारा परिणाम, पौगंडावस्थेतील मुलांसाठी शरीर व स्वभावातील बदल, संसर्गजन्य आजारावर प्रगत उपचार व अपस्मारावरील नवीन औषधी व उपचारपद्धती यांसारख्या विषयावर वैद्यकशास्त्रानुसार मंथनाला प्रारंभ करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व पुणे विभागातून सुमारे ७५० बालरोगतज्ज्ञांनी या परिषदेला हजेरी लावली आहे. रविवारी (दि.२४) परिषदेचा समारोप होणार आहे.
लघुनाटिके तून प्रबोधन
डेंग्यूचे उपचार व्यवस्थापन या विषयावर डॉ. गिरीश सुब्रह्मण्यम यांनी, तर त्वचा आजारावर डॉ. वसुधा बेलगमकर यांनी माहिती दिली. यकृताशी निगडित आजार व त्यावरील उपचाराबाबत डॉ. आशा अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. नवजात अतिदक्षता विषयावर डॉ. सोनू उदानी यांनी तर अपस्मार या विषयावर डॉ. निळू देसाई यांनी उपस्थित बालरोग तज्ज्ञांना माहिती दिली. दरम्यान, दोन्ही सत्रांच्यामध्ये डॉक्टरांकडून डॉक्टर-रुग्णांचे ताणलेल्या संबंधांवर लघुनाटिका सादर करण्यात आली. या लघुनाटिकेचे दिग्दर्शन डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी, तर लेखन डॉ. मोहन वारके यांनी केले.
---