रेडिओ सेंटरचे उद््घाटन
By admin | Published: September 30, 2015 11:39 PM2015-09-30T23:39:30+5:302015-09-30T23:41:00+5:30
रेडिओ सेंटरचे उद््घाटन
सिडको : मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, धनलक्ष्मी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत मानवधन रेडिओ सेंटरचे उद्घाटन झाले. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी मुलांमध्ये ज्ञानवृद्धी व्हावी यासाठी सदर रेडिओ सेंटरची निर्मिती केली. भारतीय शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते तसेच नाशिक विभाग एम.के.सी.एल.चे प्रमुख सुभाष पाटील, डॉ. यशवंत बर्वे, मुनशेट्टीवार, ज्योती कोल्हे आदि उपस्थित होते.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्हिजन २०२० कार्यक्रमाच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉ. विजय भटकर यांचा मोलाचा सहभाग आहे. व्हिजन २०२० मधून भारत पूर्णपणे विकसित होण्यासाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना चांगले व कलागुणांना, ज्ञानाला प्रोत्साहन देणारे कृतिशील शिक्षक मिळाले, तर त्यांना निश्चितच योग्य दिशा मिळेल, असे डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. चीन देशाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, चीनमध्ये उच्च शिक्षण, कृतिशील शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. त्याप्रमाणे भारतातही शिक्षण मातृभाषेतूनच अथवा राष्ट्रीय भाषेतून दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज भारतात शिक्षण बऱ्याच अंशी इंग्रजी माध्यमातून दिले जाते. मातृभाषेतून शिकताना संगणक भौतिकशास्त्र अशा विषयातील संकल्पना समजून येत नाहीत, असे ते म्हणाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता मोहीम राबविली त्यामागचा उद्देश त्यांनी सांगितला. चीनसारखा बलाढ्य लोकसंख्येचा देशदेखील स्वच्छ आहे. पण दुर्दैवाने भारताला अस्वच्छ देश म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला साथ देणे म्हणजे भारताच्या विकसित होण्याच्या मार्गावरचे हे पाऊल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रकाश कोल्हे यांनी मानले. (वार्ताहर)