इंद्रधनुष्य-२चे उद्घाटन
By admin | Published: September 29, 2015 11:37 PM2015-09-29T23:37:52+5:302015-09-29T23:39:40+5:30
विजयश्री चुंभळे : बालमृत्यू रोखावे
नाशिक : पेन्टाव्हॅलंट लसीविषयी मातांना आरोग्य विभागामार्फत माहिती देऊन जिल्ह्यातील बालकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करून बालमृत्यूस आळा घालावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या हस्ते पेन्टाव्हॅलंट लस व मिशन इंद्रधनुष्य फेज-२ या कार्यशाळेचे उद्घाटन व पुस्तिका प्रकाशन झाले. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना विशद केली. नोव्हेंबर २०१५ पासून सुरू होणाऱ्या पेन्टाव्हॅलंट लस आरोग्य विभागामार्फत दिली जाणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मनोगतात सांगितले की, मिशन इंद्रधनुष्य फेज-२ घेणे हे काही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन फेज-२ मध्ये वंचित बालकांचे लसीकरण पूर्ण करतील व १०० टक्के संरक्षित बालक हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. याप्रसंगी युनीसेफ मार्फत तयार करण्यात आलेल्या पेन्टाव्हॅलंट लसीबाबत मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यशाळेस डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. दावल, डॉ. युवराज देवरे, डॉ. अरविंद माहुलकर, डॉ. उदय बर्वे, डॉ. बर्वे आदिंसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)