सिन्नरला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 09:16 PM2021-09-13T21:16:52+5:302021-09-13T21:17:52+5:30
सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मेघा दराडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार कोकाटे म्हणाले, संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करताना उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची वाट न बघता या इमारतीत लोकसहभागातून साहित्य मिळवून डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करून तालुक्यातील हजारो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले; मात्र ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना सुविधा देताना अडचणी आल्या. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनअभावी कोणीही रुग्ण दगावू नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प असावा यासाठी आपण मागणी करून भुजबळ यांच्या सहकार्यातून १२० रुग्णांना २४ तास पुरेल एवढी क्षमता असलेला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाचा आगामी काळात रुग्णांना आरोग्यसेवा देताना लाभ होणार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.
कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे असताना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या रुग्णालयात वेळीच कोविड सेंटर सुरू झाल्याने तालुक्यातील रुग्णांसह आजूबाजूच्या तालुक्यातील कोरोनाबाधित आपल्या रुग्णालयात उपचार घेत ठणठणीत बरे झाले असल्याचे डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले.
दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांनी झोकून देऊन काम केले. तसेच कार्यकर्त्यांनीदेखील जिवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवा अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पुढील काळात तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका देण्याची ग्वाही त्यांनी दिली.