नाशिक बाजारात भुसार मालाची आवक मंदावली; मक्याचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:11 PM2019-01-04T12:11:09+5:302019-01-04T12:12:31+5:30

बाजारगप्पा : मक्याचे भाव क्विंटलमागे तब्बल १०० रुपयांनी उतरले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

Incessant slowdown in the Nashik market; Maize prices have come down | नाशिक बाजारात भुसार मालाची आवक मंदावली; मक्याचे भाव उतरले

नाशिक बाजारात भुसार मालाची आवक मंदावली; मक्याचे भाव उतरले

Next

- संजय दुनबळे ( नाशिक )

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमध्ये मालाचा उठाव कमी झाल्याने मागील काही दिवसांपासून तेजीत असलेले मक्याचे भाव क्विंटलमागे तब्बल १०० रुपयांनी उतरले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. विशेषत: ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी अधिक भावाने मका खरेदी केला आहे, त्यांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली आहे. लासलगावी मक्याचे भाव उतरले असले तरी सोयाबीन मात्र तेजीत असून, ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले सोयाबीनचे भाव ३४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. 

लासलगाव बाजार समितीत मक्याचे भाव १५०० ते १५२५ पर्यंत असल्याचे दिसून आले. मक्याची आयात होणार असल्याची अफवा पसरल्याने व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली असल्याची चर्चा बाजार वर्तुळात होत आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातून मुंबई, गुजरात या भागात मका पाठविली जाते. येथे मध्य प्रदेशातून मका येऊ लागली असून, त्याचा भाव जिल्ह्यातील भावापेक्षा कमी असल्याने नाशिक जिल्ह्यातील मालाचा उठाव कमी झाला असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. नाशिकमधून जाणाऱ्या मक्याला १८०० रुपयांपर्यंत, तर मध्य प्रदेशातून येणाऱ्या मक्याला १७०० रुपयांत पोहोच होऊ लागल्याने तिकडील मक्याला पसंती दिली जात आहे. त्याचा नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी १६७० ते १६८० रुपये प्रतिक्विं टल दराने मका खरेदी केली आहे, त्यांना आता मका विक्री करणे कठीण होते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. लासलगावी गत सप्ताहात मक्याची १७,४७५ क्विंटल आवक झाली. भाव साधारणत: १३८० ते १७२४ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते, तर गुरुवारी मक्याचे भाव १५०० ते १५२५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. 

मध्य प्रदेशातून होणारी सोयाबीनची आवक कमी झाल्याने सोयाबीनच्या भावात तेजी आली असून, क्विंटलमागे तब्बल २०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ३२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले सोयाबीन ३४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक अगदी तुरळक स्वरूपात होत आहे.
बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक व्यापाऱ्यांकडे थोडीफार बाजरीची आवक सुरू असल्याचे दिसून आले. गहू आवकही कमी असून, गव्हाला लासलगावी २५८२ रुपये, तर विंचूरला २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव होते. मालेगाव, नांदगाव या बाजार समित्यांमध्येही मक्यासह सर्वच भुसार मालाची आवक कमी झाली आहे. मालेगावी मक्याचे भाव १०० रुपयांनी उतरले आहेत. जुन्या हरभऱ्याची आवक कमी असून, नवीन हरभऱ्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. गत सप्ताहात लासलगावी हरभऱ्याला ३००० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव होते. हरभऱ्याचे भाव आणखी वाढतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Incessant slowdown in the Nashik market; Maize prices have come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.