पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढला
By admin | Published: March 1, 2016 11:56 PM2016-03-01T23:56:13+5:302016-03-02T00:00:00+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : औषध फवारणीची मागणी
पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या प्रारंभापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या वतीने तत्काळ पंचवटी विभागात औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना घरात बसणेही अवघड झाले आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने सध्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च केले जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात असला, तरी सध्या वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे मनपा प्रशासनही कोंडीत सापडले आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा जाणवत असल्याने नागरिक घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवतात, मात्र डास खिडक्यांद्वारे घरात प्रवेश करत असल्याने नागरिकांना दरवाजे खिडक्याही बंद ठेवाव्या लागत आहेत.
एकीकडे उकाड्याचा त्रास, तर दुसरीकडे डासांचा प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटात सध्या नागरिक सापडले आहेत. मनपा प्रशासनाने पंचवटी परिसरातील उघडे नाले तसेच गटारींच्या ठिकाणी औषध फवारणी करावी, याशिवाय परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)