पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना
By Admin | Published: January 28, 2015 02:14 AM2015-01-28T02:14:34+5:302015-01-28T02:14:59+5:30
पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना
वडाळागाव : येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील मांगीरबाबा चौकामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास झोपडीवजा दोन पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. परिसरातील सराईत चोरट्यांनी दोन्ही घरे कुलूपबंद असल्याचा फायदा घेत कुलूप तोडून घरामध्ये लूट केली व त्यानंतर पत्र्याची झोपडीवजा घरे पेटवून दिल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती. आगीत भस्मसात झालेल्या घरांमध्ये गोरगरीब मजुरांचा संसार बेचिराख झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील चौकात कापसे कुटुंबीयांची घरे आहेत. त्यापैकी सुशीला एकनाथ कापसे व नवनाथ एकनाथ कापसे यांची घरे कुलूपबंद होती. क ारण नवनाथ यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी रात्रीच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे रात्री घरांमध्ये कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कुलूप तोडले. दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे सात हजार रुपये कपाटातून चोरांनी हातोहात लंपास केले तसेच मंगळसूत्र व पायातले चांदीचे जोडवेदेखील पळवले. मात्र यावरदेखील चोरट्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट या गोरगरिबांच्या संसाराला लक्ष्य करत घरांना आग लावल्याचे कापसे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली घरे जळत असल्याचे पाहून काही नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सिडको अग्निशामक केंद्राचे दोन बंब व मुख्यालयाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशाामक दलाच्या जवानांनी अवघ्या पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे आगीत भस्मसात झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)