अवकाळी पावसाने नाशिक जिल्हयात तिघांचा बळी
By श्याम बागुल | Published: November 5, 2018 06:55 PM2018-11-05T18:55:11+5:302018-11-05T18:55:51+5:30
नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी ...
नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असला तरी, शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, सोयाबीन पिकाचे तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा उकाडा वाढला असून, अधून मधून आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. हवामानातील या बदलामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होवून रविवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील बहुतांशी भागात हजेरी लावली. त्यात विज पडून नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील महादेव सदगिर हा इसम जागीच ठार झाला तर देवळा तालुक्यातील माळवाडी येथे धोंडू सोनू बागुल यांच्या शेतात वीज पडून शेतातील चारा जळून खाक झाला. तालुक्यातीलच चिंचवे येथे पुंडलिक साबळे यांची म्हैस वीज पडून दगावली आहे. बागलाण तालुक्यातील द्याने येथे शेड नेटचे काम करणारा श्ािंटू श्यामदेव चौहाण (२९) हा इसम वीज पडून मरण पावला. चौहाण हा बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील शिवंजला येथील रहिवाशी आहे. त्याच बरोबर दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे नाल्याला आलेल्या पुरात वामन सदाशिव बस्ते (५५) हे वाहून गेल्याच भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील त्र्यंबक एकनाथ गांगुर्डे यांच्या गट नंबर १०१ मध्ये वीज पडून गाय दगावली आहे.
चौकट===
चांदवड, देवळ्याला झोडपले
रविवारी अवकाळी पावसाने चांदवड, देवळा, मालेगाव तालुक्याला झोडपले. वीजेचा कडकडाट, वादळी वा-यासह जोरदार कोसळलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. त्याच बरोबर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवघ्या काही तास कोसळलेल्या पावसात नाशिक ४, सिन्नर १, चांदवड ५८, देवळा ४१, येवला १५, नांदगाव ७, मालेगाव २२ व बागलाणला १ मिली मीटर पाऊस नोंदविला गेला आहे.