अवकाळी पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित, भाजीपाला, फळझाडांचे सर्वाधिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 08:08 PM2017-10-24T20:08:35+5:302017-10-24T20:11:11+5:30
कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान केले असून, पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकºयांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. या संदर्भात कृषी खात्याने अलीकडेच केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब निदर्शनास आली असून, प्रत्यक्ष पंचनाम्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतकर्याना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. द्राक्षबागांच्या ऐन छाटणीच्या व झाडाने फुल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला.अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी, शासनाकडून नुकसानभरपाई वा पंचनामे करण्याची सूचना नसली तरी, शेतकर्याचा त्यासाठी येणारा दबाव पाहता कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यात जिल्ह्यातील ६६२ गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्याचा फटका ४८,१८४ शेतकर्याना बसला आहे.
कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.