पोलीस असल्याची बतावणी करत फसवणुकीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:14+5:302021-06-22T04:11:14+5:30
लासलगाव येथील सुलोचना विजय कोचर (६५) या कामानिमित्त बाहेर आल्या असता कोटमगाव रोड वरील जाधव गॅस एजन्सी ...
लासलगाव येथील सुलोचना विजय कोचर (६५) या कामानिमित्त बाहेर आल्या असता कोटमगाव रोड वरील जाधव गॅस एजन्सी जवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत दररोज चोरीच्या घटना घडत असल्याने तुमच्याकडे असलेले दागिने पिशवीत काढून ठेवा असे सांगितले. सदर महिलेला आणखी एकाने जवळ येत सदर व्यक्ती पोलीस असल्याची बतावणी केली. त्यावर विश्वास ठेवत सदर महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवले. यावेळी भामट्यांनी सुलोचना कोचर यांची दिशाभूल करत हातचलाखीने दागिने लंपास केले. आपण फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत भरवस फाटा येथे दतात्रेय कोळपकर यांनाही पोलीस असल्याचे सांगून सोन्याची अंगठी लंपास केली.
इन्फो
पोलीस पथके रवाना
निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे व पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यात पोलीस असल्याचे अथवा सीआयडी असल्याचे खोटे सांगत फसवणूक करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. नागरिकांनी सावध राहून अशा लोकांपासून दूर राहावे, असे आवाहन लासलगाव पोलिसांनी केले आहे.