‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’मुळे हेल्मेट चोरीच्या घटना ; इंदिरानगरला पोलिसाच्याच हेल्मेटवर केला हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:41+5:302021-08-21T04:18:41+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्ताला तैनात असताना त्यांनी दुचाकीवर लावलेल्या हेल्मेटवरच एका चोरट्याने हात साफ ...
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्ताला तैनात असताना त्यांनी दुचाकीवर लावलेल्या हेल्मेटवरच एका चोरट्याने हात साफ केल्याची घटना घडली. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकीवरून जात असताना हेल्मेट ताब्यात घेत संशयितास समज देत पुन्हा अशाप्रकारे हेल्मेट चोरी केल्यास सक्त कारवाईचा इशारा देऊन सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून शहरातील पेट्रोल पंपांवर ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर हेल्मेट नसल्यास पेट्रोल दिले जात नसल्याने इंदिरानगर, पाथर्डी फाटा, राजीवनगर साईनाथनगर, विनयनगर, भाभानगरसह परिसरात आणि शहरातील वाहनतळावर उभ्या असलेल्या किंवा दुकानासमोर खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या दुचाकीला लावलेल्या हेल्मेटच्या चोरीचे प्रकार समोर येत असून, गेल्या तीन-चार दिवसांमध्ये अशा हेल्मेट चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, हेल्मेट चोरीला गेल्यानंतर सुमारे हजार ते पंधराशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे.