निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगलीच्या घटना - पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 08:30 AM2021-11-16T08:30:55+5:302021-11-16T08:34:41+5:30
काही राजकीय पक्षांकडून शांततेला धक्का लावण्याचे षड्यंत्र
नाशिक : त्रिपुरात जे काही घडले त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचा काही संबंध नाही. परंतु काही अशा संघटना आहेत त्या निमित्त शोधून रस्त्यावर येतात. अशा लोकांबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा. उत्तर प्रदेशसह तीन राज्यांच्या निवडणुका लवकरच होतील, ते डोळ्यांसमोर ठेवून दंगली घडविण्याच्या घटना घडत आहेत. राज्य शांततेत वाटचाल करीत असताना त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता माध्यमांशी बोलताना केला.
अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, पवार यांनी अशा वक्तव्याची नोंद घेण्याचीही गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्रिपुराच्या निमित्ताने एका राजकीय पक्षाने अमरावती बंदचा निर्णय घेतला. याचाच अर्थ नैराश्येतून शांततेला धक्का लावण्याचे काम केले जात असून, हे सारे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. चार राज्यांच्या व त्यातही उत्तर प्रदेशातील निवडणूक दिशा देणारी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काही प्रकरणे मुद्दाम उकरून काढली जात असल्याचेही ते म्हणाले.
देशात मोदी यांना पर्याय नाही, असे नाही. १९७५ ते ७७ या काळात कोणी सक्षम नेता नव्हता, त्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्या कालखंडात मोरारजीभाईंनी नेतृत्व करावे, असे कोणाच्या डोक्यात विचारही नव्हते. पर्याय नाही असे नाही, तर पर्याय असतो तो काढावा लागतो, असे सांगून पवार यांनी मोदी यांना देशात सक्षम पर्याय उभा राहू शकतो, असे संकेत दिले.
अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्रास देण्याचा प्रयत्न काही ठराविक विचारांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मंत्री, पदाधिकाऱ्यांना चौकशी, धाडी टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता हे नित्याचेच झाले आहे. त्याची चिंता आम्ही फारशी करीत नाही. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना काही गोष्टींची पूर्तता करता आली नाही. ते लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय हा त्याचाच भाग असल्याचेही ते म्हणाले.
अमरावतीसह राज्यात परिस्थिती नियंत्रणात
संवेदनशील शहरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर येथे सांगितले. राज्यातील काही शहरांमध्ये जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला याची सखोल
चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपने काढलेल्या मोर्चावर पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील.
नियम सर्वांनीच पाळायचे असतात. जमावबंदीमध्ये मोर्चे काढणे योग्य नाही, असेही वळसे पाटील म्हणाले.