कोरोनामुळे उत्पन्न लॉक ; महावितरणचा मात्र ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:10 PM2020-06-22T16:10:06+5:302020-06-22T16:16:34+5:30
टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरांमध्ये दिसून येत आहे.
नाशिक : कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरांमध्ये दिसून येत आहे.
महावितरणकडून लॉकडाऊनच्या काळात वीज मिटर रिडींग न घेता ग्राहकांना अंदाजे सरासरी वीजबिल दिल्यामुळे सिडकोतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यातील काही नागरिकांना चक्क दहा हजार तर काही नागरिकांना लाख रुपयांपर्यंतचे बिल देण्यात आल्याने महावितरणच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या २२ मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात महावितरणकडून कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मीटर रीडिंग घेण्याचे काम बंद करून सरासरी वीजबील आकारणी करण्याचे धोरण आजमावले होते. त्यामुळे नागरिकांना दरमहिन्याप्रमाणे वीज बील येईल अशी अपेक्षा होती. मात्र महावितरणकडून मिळालेले वीजबील पाहिल्यानंतर ग्राहकांना धक्काच बसला आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना सरासरी अंदाजे बिल दिल्याचे सांगितले जात असले तरी बहुतांशी नागरिकांना यापूर्वी येणाऱ्या वीजबिलापेक्षा लॉकाडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा बील मिळाल्याने नागरिकांधमधून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोनशे रुपयांपर्यंत बीजबील येणाºया नागरिकांना आता हजाराहून अधिक तर काही नागरिकांना चक्क लाख रुपयांपर्यंत वीजबील देण्याचा प्रताप महावितरणच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आधिच लॉकडॉऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना महावितरणने अव्वाच्या सव्वा वीजबील आकारून एक प्रकारे नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले असताना महावितरण त्यांना वाढीव वीजबीलांचा शॉक देत असल्याची भावना नागरिकांध्ये निर्माण झाली आहे.