निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून लाखो रु पयांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:10 PM2020-01-13T16:10:57+5:302020-01-13T16:11:11+5:30
जायखेडा : बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने नैसर्गिक संकटांशी दोन हात करीत वेळोवेळी आलेल्या आपत्तींवर मात करून आपल्या चिकाटी, कष्ट, मेहनत व कौशल्याच्या जोरावर अवघ्या तीन एकरवरील द्राक्षबागेत जवळपास ३० टन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून ३० ते ३१ लाख रु पयांचे उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
त्यांचीही कामगिरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे असून, ‘कोशिश करणे वालोंकी हार नही होती’ हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांची तीन एकरवरील बहरलेली द्राक्ष बाग सध्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरली आहे. या बागेस जिल्हाभरातील शेतकरी भेट देत असून, त्यांच्या बागेचे व कामाचे कौतुक होत आहे.
तांदूळवाडी या छोट्याशा गावात सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने क्रि मसन सीडलेस हे नवीन वाण असलेले द्राक्ष लावून ही किमया साध्य केली आहे. क्रि मसन सीडलेस ही व्हरायटी बागलाण तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. कुज, गळ व क्रॅकिंग व अन्य रोगांना हे वाण सहसा बळी पडत नसल्याने व याचा उत्पादन खर्च ही एकरी एक ते सव्वा लाख इतका कमी आहे.