काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:20 AM2019-03-23T01:20:38+5:302019-03-23T01:21:09+5:30

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत.

 Income tax Department ready to stop black money | काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

Next

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाल्याची माहिती नागपूर येथील आयकर विभागाचे प्रधान संचालक (चौकशी) जय राज काजला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यातील विमानतळांवर नजर ठेवण्यासाठीही खास पथके तैनात करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागांतर्गत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्टÑ (शिर्डी व नगर वगळता) या भागातील २४ लोकसभा मतदारसंघ येत असल्याची माहिती काजला यांनी दिली. यातील प्रत्येक विभागासाठी एक नोडल आॅफिसर नियुक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्टÑासाठी नाशिक आयकर विभागाचे सहसंचालक अमितकुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या हाताखाली १४ सबनोडल आॅफिसर आणि व्हेरिफिकेशन आॅफिसर असा ताफा राहणार आहे. ही पथके काळ्या पैशावर नजर ठेवणार असून, मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काजला यांनी सांगितले. काळ्या पैशाबाबत कोणाला आयकर विभागाला माहिती द्यावयाची असल्यास त्यांच्यासाठी १८०० २३३ ३७८५ हा टोल फ्री क्रमांक तसेच ९४०३३९१६६४ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही उपलब्ध असल्याचे काजला यांनी सांगितले. याशिवाय ०७१२-२५२५८४४ हा फॅक्सही वापरता येईल. माहिती देणाऱ्याची इच्छा असल्यास त्याचे नाव गुप्त राखले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या काळामध्ये बॅँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बॅँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी नाशिक आयकर विभागाचे सहसंचालक अमितकुमार सिंग, सहायक संचालक अशोक मुराई, आयकर अधिकारी धनराज बोराडे आदी उपस्थित होते.
अडीच कोटींची रोकड जप्त
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागात सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहितीही काजला यांनी यावेळी दिली. शुक्रवारी रामटेक मतदारसंघामध्ये ५० लाख रुपयांची रोकड जप्त झाली आहे, तर याआधी बीड मतदारसंघामध्ये १ कोटी ९० लाखांची रोकड जप्त केली गेली आहे. याबाबतची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
विमानतळांवरही पथके करणार तैनात
विभागातील सर्व विमानतळांवरही आयकर विभागाची नजर
राहणार असून, प्रत्येक विमानतळावर पथके तैनात केली जाणार आहेत. नागपूर, औरंगाबाद, गोंदिया, नांदेड, जळगाव आणि नाशिक ही विमानतळे रडारवर आहेत. ज्या विमानतळांवर नियमितपणे विमानांचे आगमन-निर्गमन होते तेथे तसेच अन्य ठिकाणीही विमाने तसेच हेलिकॉप्टरने येणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांचीही तपासणी होऊ शकते.

Web Title:  Income tax Department ready to stop black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.