त्र्यंबकमध्ये आयकर छापे : नऊ पुरोहितांना नोटिसा
By admin | Published: December 28, 2016 12:07 AM2016-12-28T00:07:21+5:302016-12-28T00:09:24+5:30
पुरोहितांच्या कुंडलीत ‘धन’ वक्री
!नाशिक : नारायण नागबली, कालसर्पयोग आणि तत्सम पूजाविधी घालून श्रद्धाळूंची पिडा दूर करण्याचा दावा करणाऱ्या त्र्यंबकेश्वरातील पुरोहित वर्गाच्या कुंडलीतच ‘धन’ वक्री निघाल्याने त्यांच्यापाठी आयकर विभागाचे चांगलेच शुक्लकाष्ठ लागले आहे. या विभागाने टाकलेल्या धाडीत काही पुरोहितांकडे बेहिशेबी संपत्ती व महागड्या गाड्यांचा ताफा आढळून आल्याचे वृत्त आहे.केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात अनेक ठिकाणी आयकर विभाग तसेच पोलिसांनी छापे टाकून बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे़ यामध्ये अद्यापपर्यंत देवस्थान तसेच पुरोहित वर्गाला लक्ष्य करण्यात आले नव्हते़ मात्र, सदरच्या निर्णयानंतर त्र्यंबकेश्वरमधील विविध बँकांच्या शाखांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात रक्कम भरली गेल्याचे समोर आल्याने आयकर विभागाने याकडे लक्ष पुरविले आहे़ त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शिवाय येथे होणाऱ्या नारायण नागबली, कालसर्पयोग यांसारख्या पूजाविधींसाठी देशभरातून भाविक येतात़ त्यात अनेक बड्या व्यावसायिक व उद्योगपतींसह व्हीआयपींचा समावेश असतो. एका पुरोहिताकडून प्रतिदिनी पाच ते पंचवीस, तीस भाविक पूजाविधी करून घेतात़ किमान पाच हजार ते यजमानाच्या कुवतीनुसार पन्नास हजारांपर्यंत दक्षिणा त्यासाठी घेतली जाते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. अन्य व्यवसायात कॅशलेस व्यवहार होत असले तरी पूजाविधीसाठी कोणत्याही ई-व्यवहाराची सोय नाही. त्यामुळे आयकर विभागाने पुरोहितांना मिळणाऱ्या बेहिशोबी दक्षिणेवर व त्यासंबंधीच्या उलाढालींवर लक्ष केंद्रित केले आहे़ त्यातूनच दोघा जणांवर छापे टाकण्यात आले़ शनिवारपासून सदर कारवाई केली जात असली तरी त्याबाबत गोपनीयता बाळगली गेली होती़ मंगळवारी ही बाब प्रामुख्याने उघडकीस आल्यावर इतरांनी घरातील रोकड इतरत्र हलवण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. चौकशी पथकाकडून अनेक पुरोहितांची बँक खाती तपासली जात असल्याचे वृत्त असून, नोटाबंदीनंतर कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा तपास सुरू आहे. आयकर औरंगाबाद विभागाच्या पंधरा ते वीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे ही कारवाई केली जात आहे़(प्रतिनिधी)
पुरोहित पहिल्यांदाच आयकराच्या फेऱ्यात
भाविकांच्या दुर्दैवाचा फेरा पूजाविधीद्वारे संपुष्टात आणण्याचा दावा करणारे पुरोहित स्वत:च आयकराच्या फेऱ्यात अडकल्याने त्याची चर्चा होत आहे़ पुरोहितांकडे जमिनीसह बेहिशेबी पैसा, सोने व दागिने यांचे मोठे घबाड असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून, ही संपत्ती वैध की अवैध याचीदेखील चौकशी करण्यात येत आहे़ त्र्यंबकेश्वरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई होत असल्याने पुरोहितवर्गाचे धाबे दणाणले आहे. गत दोन दिवसांपासून तेथे केल्या जाणाऱ्या पूजाविधीवरही परिणाम झाला आहे़