पंढरपूर यात्रेतून महामंडळाला दिड कोटींचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:06 PM2019-07-22T18:06:56+5:302019-07-22T18:08:20+5:30
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून नाशिकच्या एस.टी. महामंडळाला दिड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले ...
नाशिक: आषाढी एकादशीनिमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून नाशिकच्या एस.टी. महामंडळाला दिड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहा लाख रूपये अधिक उत्पन्न मिळाले असून जास्तीत जास्त प्रवाशांनी बसेसच्या माध्यमातून यात्रा केल्याने पंढरपूरचा विठुराया महामंडळाला उत्पन्नाच्या रुपाने पावला आहे.
पंढरपुर येथील यात्रेसाठी जिल्ह्यातील १३ डेपोंमधून सुमारे २९५ बसेस सोडण्यात आल्या होत्या. गेल्या ८ ते १३ जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी करण्यात आलेल्या प्रवासी वाहतुकीतून महामंडळाला तब्बल १ कोटी ५१ लाख ६७ हजार ९६३ रूपये इतके उत्पन्न मिळाले आहेत. पंढरपूरकडे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता सर्वच आगारांमध्ये जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यानुसार नाशिक विभागाने सुमारे ३५० बसेसचे नियोजन केलेले होते. या बसेस नाशिक, नाशिकरोड, भगूर, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, सटाणा, मनमाड, सिन्नर, वावी, चांदवड, मनमाड, नागपूर, देवळा, ताहाराबाद, रावळगाव, लासलगाव, विंचूर येथून या बसेस सुटणार आहेत. पेठ, कळवण, नांदगाव, इगतपुरी, पिंपळगाव बसवंत या ठिकाणाहून यात्रेसाठी प्रवासी वाहतूक करण्यात आली.