अकार्यक्षम नगरसेवकांची तिकिटे कापणार ?
By admin | Published: January 29, 2017 10:58 PM2017-01-29T22:58:26+5:302017-01-29T22:58:44+5:30
वाढती स्पर्धा : सुमारे २५ नगरसेवकांचा होणार पत्ता कट
नाशिक : महापालिका निवडणुकीत प्रामुख्याने सेना-भाजपात उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. याशिवाय मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही तिकिटासाठी बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. मात्र, या सर्वच राजकीय पक्षांकडून गेल्या पाच वर्षांत कर्तृत्वाचा ठसा उमटू न शकलेल्या अकार्यक्षम नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान सुमारे २५ नगरसेवकांची तिकिटे कापली जाण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत प्रत्यक्ष याद्या जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचे वास्तव समोर येईल. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही आटोपला आहे. आता प्रत्यक्ष तिकिटाच्या स्पर्धेत कोण टिकतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. प्रामुख्याने, सेना-भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे. निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग येऊन आतापर्यंत ४३ नगरसेवकांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिलेली आहे. त्यात शिवसेनेकडे १७, तर भाजपात ९ नगरसेवक दाखल झालेले आहेत. पक्षांतराचा सर्वाधिक फटका मनसेला बसून त्यांचे २८ नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. सेना-भाजपात तिकिटासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पक्षात एण्ट्री दिल्याने दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आता उमेदवारी घोषित होण्याची प्रतीक्षा होत असतानाच सुमारे २५ विद्यमान नगरसेवकांची अकार्यक्षमता, पुन्हा निवडून न येण्याची क्षमता या गोष्टी लक्षात ठेवून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये १८ महिला नगरसेवकांचाच समावेश असल्याचे समजते. प्रामुख्याने, सेना-भाजपात गेलेल्या काही नगरसेवकांना तिकीट न मिळण्याची चर्चा होत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीतही काही नगरसेवकांना नारळ देऊन निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. सेना-भाजपात दाखल झालेल्या मनसेच्या काही नगरसेवकांची पंचवार्षिक कारकीर्द यथातथाच राहिल्याने त्यांना पुन्हा तिकिटे देण्यास पक्षातूनच विरोध होत आहे. पक्षाने जर त्यांना तिकिटे नाकारली तर त्यांची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी होणार आहे. कारण, मनसेने पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा पक्षात न घेण्याचे याआधीच जाहीर केले आहे. येत्या दोन दिवसांत राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, त्यावेळी कुणाचा पत्ता कट झाला, याचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत संबंधितांनी मात्र धसका घेतला आहे.
काही नगरसेवकांची विश्रांती
सन २०१२-१७ या पंचवार्षिक काळात महापालिका सभागृहातील पाच नगरसेवकांना राज्य विधिमंडळात जाण्याचे भाग्य लाभले. त्यात, भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर व अपूर्व हिरे यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीत हे पाचही आमदार रिंगणात नसतील. त्यांच्याऐवजी त्यांचे वारसदार प्रभागाचा भार सांभाळण्याची शक्यता आहे. याशिवाय, शिवसेनेचे शिवाजी सहाणे, रिपाइंच्या ललिता भालेराव यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याचे सभागृहातच जाहीर केले आहे. तर विद्यमान नगरसेवकांपैकी सुमारे १८ ते २० नगरसेवकांकडून विश्रांती घेणे पसंत केले असल्याचे समजते. त्यांच्याऐवजी कुटुंबातील कुणीतरी सदस्य निवडणूक रिंगणात दिसेल.