अक्षम्य : मोकभणगी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या प्रेताची हेळसांड
By admin | Published: September 8, 2015 12:13 AM2015-09-08T00:13:11+5:302015-09-08T00:15:16+5:30
दोषींवर कारवाईसाठी प्रशासनाला ग्रामस्थांचे साकडे
कळवण : मोकभणगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदिवासी परिचर पंडित गांगुर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणे गरजेचे असताना टाळाटाळ करण्यास कारणीभूत असलेल्या कर्मचारी व यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी मयत गांगुर्डे यांच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
मोकभणगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून पंडित गांगुर्डे शनिवारी सेवेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना भालशंकर यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना शासकीय वाहनाद्वारे नाशिक येथे खासगी रुग्णालयात हलविले. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शासकीय कर्मचारी असल्याने नाशिक येथेच जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणे गरजेचे असताना तसे न करता मयत गांगुर्डे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी गोबापूर येथे आणला. गांगुर्डे यांचा परिवार व नातेवाईक अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडण्याची तयारी करत असताना गांगुर्डे यांचे शवविच्छेदन झाले नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. विमा व इतर शासकीय बाबींसाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा शवविच्छेदन करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविल्याने शासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईमुळे हेळसांड झाली.
आरोग्य विभागाच्या यंत्रणेने आपल्याच विभागाच्या कर्मचाऱ्याबाबत घेतलेली भूमिका संशयास्पद असून, संपूर्ण घटनाक्र माची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी तालुक्यातील आदिवासी संघटनांनी केली आहे. (वार्ताहर)
आरोग्य उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर
मोकभणगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना भालशंकर यांच्या वादग्रस्त कारकिर्दीची व कामकाजाची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. मयत कर्मचारी पंडित गांगुर्डे यांच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, आदिवासी लोकप्रतिनिधीनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अहवाल वरिष्ठांनी मागवला असून, जिल्हा परिषदेने डॉ. भालशंकर यांच्या बदलीचा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका
मोकभणगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी सैनिक असलेल्या गोपीनाथ जगताप या परिचर कर्मचाऱ्याने दि.१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना पत्राद्वारे आरोग्य केंद्रातील परिचर कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका असल्याचे कळविले आहे. याच अनुषंगाने गांगुर्डे यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित होत असून, शवविच्छेदनाच्या घटनाक्र मानुसार संशय निर्माण होत आहे . या पत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. भालशंकर या परिचरांचा मानसिक छळ करत असून, प्रत्येक मिटिंगमध्ये वेळोवेळी अपमान करतात व ड्यूटी करूनही गैरहजर दाखवितात. तसेच पगार काढण्याबद्दल धमक्या देतात. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप खंडेराव सर्व परिचरांना धमक्या देतात, असेही जगताप यांनी पत्रात नमूद केले आहे.
''गांगुर्डे यांना सेवा बजावत असताना अवस्थ वाटू लागल्याने तत्काळ नाशिक येथे हलविण्यात आले तसेच खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. याबाबत डॉ. लीना भालशंकर यांनी मला तालुका वैद्यकीय अधिकारी या नात्याने कळविणे गरजेचे होते. शिवाय शवविच्छेदन करून मृतदेह गोबापूर येथे आणावयास पाहिजे होता. परंतु तसे न झाल्याने मृतदेहाची हेळसांड झाली. याबाबत आपण वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अहवाल दिला आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवरे यांच्या चौकशी समितीने मोकभणगी येथे भेट दिली. सदर समितीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असून, याप्रकरणी वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.
- डॉ. नीलेश वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी