अपूर्ण घरकुले, अखर्चित निधीवरून नाराजी

By admin | Published: July 13, 2017 11:41 PM2017-07-13T23:41:36+5:302017-07-13T23:46:27+5:30

आढावा बैठक : दादा भुसे यांच्याकडून अधिकाऱ्यांना कानपिचक्या

Incomplete homework, angry over the unforeseen funding | अपूर्ण घरकुले, अखर्चित निधीवरून नाराजी

अपूर्ण घरकुले, अखर्चित निधीवरून नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन वर्षांत पाच हजारांहून अधिक अपूर्ण असलेल्या घरकुलांच्या संख्येवरून तसेच महिला व बालकल्याण विभाग आणि समाजकल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वेळेत खर्च न झाल्याच्या कारणावरून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांसह गटविकास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कानपिचक्या दिल्या.
शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची यादीच बनवित त्यांनी याप्रकरणी संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही जिल्ह्णातील आमदार व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दादा भुसे यांनी १ ते २३ प्रकारच्या मुद्द्यांवर विविध विभागांच्या खातेप्रमुखांचा आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीलाच स्वच्छता अभियानातर्गंत व आरोग्य विभागांतर्गत राज्यस्तरावर चांगले काम केल्याने नाशिक जिल्हा परिषदेला मिळालेल्या पुरस्काराबाबत अनुक्रमे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक्चौरे यांचा दादा भुसे यांनी पुस्तक भेट देऊन सत्कार केला. इंदिरा आवासची जवळपास सहा हजार घरकुले अपूर्ण राहिल्याबाबत प्रभारी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक प्रदीप चौधरी यांना विचारणा केली. भौतिक उद्दिष्ट व आर्थिक उद्दिष्टात तफावत असल्याने अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक दिसत असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सांगितले. २८ हजारांपासून सुरुवात झालेली घरकुल योजना आज दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ज्यांचे घरकुलांचे काम प्रलंबित दिसत असेल. त्यांचे प्रबोधन करून त्यांच्याकडून दिली गेलेली घरकुलाची रक्कम जमा करून त्यांना नव्याने दीड लाखांच्या योजनेतून घरकुलाचा लाभ देता येईल, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. निफाड, सिन्नर, बागलाण, चांदवड व नांदगावमध्ये अपूर्ण घरकुलांची संख्या अधिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रधानमंत्री आवास योजनेतून १४ हजार ७१५ घरकुले देण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील १२ हजार ६९८ घरकुलांचे काम सुरू आहे. सिन्नर तालुक्यात २३६ घरकुलांची कामे अपूर्ण असल्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना भुसे यांनी धारेवर धरले, तर मालेगावचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनाही अपूर्ण कामांबाबत विचारणा केली असता त्यांनी दीडशे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झाले नसल्याचे सांगितले. घरकुल योजनेत ज्यांची नावे नाहीत, त्यांना फॉर्म ड भरून घरकुलाचा लाभ देता येईल, त्यानुसार फॉर्म ड भरून घेण्याचे आदेश भुसे यांनी दिले.
दलित वस्तीची कामे अपूर्ण
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २००५-०६ पासून आतापर्यंत ५४७२ कामे मंजूर असून, त्यातील ३२७१ कामे पूर्ण असल्याचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी सांगितले. त्यातील २२०१ कामे अपूर्ण असून, त्यातही १४२७ कामे गेल्या प्रलंबित असल्याकडे भुसे यांनी ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
महिला बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाखोंचा निधी अखर्चित राहिल्याबाबत भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांना प्रशिक्षणासाठी १९ लाखांचा तर आहार पुरविण्यासाठीचा ३० लाखांचा निधी अखर्चित का राहिला, असे भुसे यांनी मुंडेंना विचारले. त्यावर निवडणुकांची आचारसंहिता व मान्यताअभावी हा निधी अखर्चित राहिल्याचा खुलासा प्रतिभा संगमनेरे यांनी केला. मार्चअखेर जिल्हा हगणदारीमुक्त
संपूर्ण स्वच्छता अभियानाचा आढावा घेताना दादा भुसे यांनी, जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त कधी होणार, याची विचारणा केली. आतापर्यंत तीन तालुके शंभर टक्के हगणदारीमुक्त झाले असून, मार्च २०१८ अखेर संपूर्ण जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्याचे विभागाचे नियोजन असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले. १५ पैकी तीन तालुके शंभर टक्के हगणदारीमुक्त झाले असून, उर्वरित १२ तालुके मार्च १८ अखेर हगणदारीमुक्त करण्यासाठी तालुका नियोजन उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे संगमनेरे यांनी सांगितले. सुरगाणा, नांदगाव, येवला तालुक्यात गती देण्याचे आदेश देतानाच मालेगाव तालुक्यातही विशेष लक्ष पुरविण्याचे आदेश दादा भुसे यांनी बैठकीत दिले. तसेच केवळ कागदावर शंभर टक्के शौचालय उभारणीची आकडेवारी अभिप्रेत नसून, शौचालयांचा प्रत्यक्ष वापरही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे भुसे यांनी सांगितले.

Web Title: Incomplete homework, angry over the unforeseen funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.