रक्कम खात्यात जमा होणार असल्याने गैरसोय
By admin | Published: July 1, 2017 12:52 AM2017-07-01T00:52:19+5:302017-07-01T00:52:37+5:30
ताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
ताहाराबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील मुले, सर्व मुलींना सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश देण्यात येतो. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात रोख स्वरूपात रक्कम थेट बॅँक खात्यात दिली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यास त्याच्या पालकांसोबत संयुक्तपणे बॅँकेत खाते उघडण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत. मात्र, काही बॅँकांच्या शाखांत झिरो बॅलन्स खाते उघडण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने चारशे रु पयांसाठी पाचशे रुपयांचे खाते उघडण्याची वेळ पालकांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन गणवेश खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० रुपये दिले जातात. परंतु योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांंच्या खात्यावर ही रक्कम दिली जाणार आहे. राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी पत्र पाठवून शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकारी यांना दिल्या होत्या. परंतु प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे अद्यापही शाळा, केंद्रपातळीवर माहिती संकलनाचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळतील याबाबत सांगता येत नाही. जिल्हा परिषद शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांंच्या पालकांची बैठक बोलावून विद्यार्थी व पालकांच्या नावाने संयुक्त बॅँक खाते उघडण्याची माहिती शाळास्तरावरून देण्यात आली आहे. खाते उघडण्यासाठी आधारलिंक अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जे नव्याने प्रवेश घेणार आहेत अशा पालकांनासुद्धा याबाबतीत माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. अनेक पालक आता नव्याने खाते उघडण्यास तयार नाहीत. याअगोदरच अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावासह संयुक्त खाते उघडले आहे. नवीन खाते राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, शेड्यूल बॅँकेत उघडण्याचे सूचित केले आहे. बॅँकांनी विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्सवर खाते द्यावे, असे आदेश आहेत. अनेक बॅँका झिरो बॅलेन्सवर खाते देत नसल्याची पालकांची तक्रार आहे. यामध्ये किमान पाचशे रुपये तरी ठेवावे, असे सांगण्यात येते.
गतवर्षाप्रमाणे योजना ठेवावी
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यात गणवेशाची रक्कम थेट जमा करण्यात आली होती. मुख्याध्यापक, शिक्षकांनी बचतगटांमार्फत गणवेश शिलाई केले. त्यामुळे बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळाले होते. काही पालक संयुक्त खाते उघडण्यास तयार नाहीत. त्यामुळे ही रक्कम खात्यात देणार तरी कशी, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. मागील वर्षीप्रमाणेच ही योजना ठेवावी, अशीही मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक करत आहेत.