घासलेटचा पुरवठा बंद झाल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:35 PM2017-08-08T23:35:25+5:302017-08-09T00:16:22+5:30
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील रॉकेल वितरण व्यवस्था शासन स्तरावरून ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. घासलेट विना अनेकांच्या घरातील चुली पेटत नसून रात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे.
साकोरा : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरासह ग्रामीण भागातील रॉकेल वितरण व्यवस्था शासन स्तरावरून ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. घासलेट विना अनेकांच्या घरातील चुली पेटत नसून रात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे.
शासनाच्या पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून गरिबांसाठी दिल्या जाणाºया घासलेट वितरणात काळा बाजार फोफावला होता. त्यात अधिकारी व किरकोळ विक्रेत्यांनी कित्येक गावांचा संपूर्ण कोटाच शहरातच लंपास करून पैसा आपल्या घशात घातला. त्याच अनुषंगाने वरिष्ठ अधिकाºयांनी सहा महिन्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील सर्व चारशे किरकोळ विक्रेत्यांना एकत्रित करून बैठक घेतली. प्रत्येक गावातील गॅसधारकांची तसेच शिधापत्रिकांच्या याद्या मागविण्यात आल्या. तसेच प्रत्येक डिलरकडून घोषणापत्र बनवून घेतले. त्यात फक्त साकोरा येथील तीन विक्र ेत्यांनी सदोष याद्या दिल्या. मात्र इतरांनी दिल्याच नसल्याने संपूर्ण तालुक्याचा रॉकेलचा पुरवठा बंद करण्यात आला असल्याचे एक खात्रीलायक वृत्त आहे. साकोरा गावात तीन हजार चारशे शिधापत्रिका तर चाळीस टक्के बिगर गॅसधारक आहेत. त्यानुसार सतराशे लीटरचा पुरवठा होणे आवश्यक असताना गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पुरवठा होत नाही. सदर घासलेट जाते कुठे असा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. पैकी साकोरा गावासाठी जून महिन्यात अवघा ४०२ लीटर रॉकेल मिळाले. त्यात ते चुटकीसरशी संपून गेले कारण या महिन्यात गावात अनेकांचे निधन झाले. त्यामुळे अंत्यसंस्कारसाठी घासलेटचा अधिक वापर झाला. शासनाला या गोष्टीशी काही देणे- घेणे नसल्याचे दिसून येत आहे. आता तर गॅस सिलिंडरच्या भाव दर महिन्याला वाढणार असल्याने सामान्य जनतेने जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून घासलेटचा कोटा उपलब्ध न झाल्याने लाभार्थींची उपासमार होताना दिसून येत आहे.