देवळ्यात शेतकऱ्यांची गैरसोय
By admin | Published: February 4, 2017 01:12 AM2017-02-04T01:12:42+5:302017-02-04T01:12:58+5:30
आवक वाढली : भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र जागेची मागणी
देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केट सुरू झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागला असून, भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे. देवळा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. रविवार सुटीचा दिवस सोडून सायंकाळी साडेपाच वाजता नियमितपणे बाजार समितीच्या आवारात भाजीपाला मार्केट भरत आहे.
मागील डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला मार्केटच्या शुभारंभदिनी भाजीपाला उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तालुक्याबरोबरच शेजारील कळवण, सटाणा, चांदवड आदि तालुक्यातूनही भाजीपाला येथे येऊ लागला आहे. भुसार मालाच्या गुदामात या भाजीपाला मार्केटसाठी जागा दिली आहे. भाजीपाल्याची वाढती
आवक पाहता ही जागा अपुरी
पडू लागली असून, स्वतंत्र व
मोठ्या जागेची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील शेतकरी मिरची, वांगी, कोबी, बीट, पपई, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, शेवगा, टमाटे, भेंडी, मुळा आदि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. सदर भाजीपाल्याच्या विक्रीसाठी जवळपास मार्केट नसल्याने व भाजीपाला नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. देवळा येथे भाजीपाला मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची भाजीपाला विक्रीसाठी सोय
झाली आहे. यापूर्वी कमी प्रमाणात पिकवलेला भाजीपाला इतरत्र मार्केटला नेऊन विकणे परवडत नव्हते. मंदीच्या काळात वाहतूक खर्चदेखील सुटत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. देवळा
येथील भाजीपाला मार्केटला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)