सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:31+5:302021-08-25T04:18:31+5:30
नांदूरवैद्य : यावर्षी पावसाच्या उघडिपीमुळे व सततच्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्याचा ...
नांदूरवैद्य : यावर्षी पावसाच्या उघडिपीमुळे व सततच्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आले असून येथील भैरोबा मळ्यात नवीन रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी नाशिक येथील वीज वितरण कार्यालयात अर्जाद्वारे केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या या मागणीला संबंधित विभागाने केराची टोपली दाखवली असून एक महिन्यात या ठिकाणी नवीन रोहित्र न बसविल्यास साकूर फाटा येथील वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील माजी सैनिक किसन सहाने यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील भैरोबा मळा परिसरात असलेल्या रोहित्रावर जवळपास १०० ते १३० वीजजोडण्या असून या परिसरात अनेक दिवसांपासून सततच्या खंडित पुरवठ्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले असून यावर्षी पावसाच्या उघडिपीमुळे ऐन मोसमात भात पिकांसह इतर पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी एक सिंगल फेजचे रोहित्र असून त्यावर १०० हून अधिक वीजजोडण्या असल्यामुळे विजेच्या दैनंदिन खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी तातडीने एक नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी साकूर येथील भैरोबा मळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
--------------------
नाशिक येथील वीज वितरण कार्यालयात सर्व कागदपत्रे सादर करत नवीन रोहित्र बसविण्यासाठी आम्ही शेतकरी दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले असून उभे पिकांची पाण्याविना नुकसान होत आहे. बळीराजाला दिलासा देण्यात यावा.
- किसन सहाणे, शेतकरी, साकूर
साकूर येथील हेच ते सिंगल फेजचे रोहित्र. (२४ नांदूरवैद्य १)
240821\24nsk_3_24082021_13.jpg
२४ नांदूरवैद्य १