गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 09:39 PM2019-10-17T21:39:27+5:302019-10-17T21:53:51+5:30
देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.
नाशिक : देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.
ग्रामीण भागात पूर्वी स्थानिक पोलीसपाटील, कोतवाल, तलाठी, कर्मचाºयांची आपुलकीने विचारपूस करून आवश्यक सोयी उपलब्ध करून देत असे. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे गैरसोय वाढल्याने कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेसह जिल्हा बँका, मार्केट कमिट्या अशा विविध संस्थांच्या मिळून वर्षात किमान दोन तरी निवडणुका होतात. या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावपातळीपासून ते दिल्लीतील निवडणूक आयोगापर्यंत अनेक कर्मचारी कार्यरत असतात. यात प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश असतो. परंतु हा वर्ग नेहमीच निवडणुकीच्या जबाबदारीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतो. कारण अनेकदा निवडणुकीची जबाबदारी मिळालेल्या मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्थाच नसते. पावसाळ्यात डासांमुळे तर हिवाळ्यात थंडीने कर्मचारी त्रस्त होतात. सोबतच पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांसोबत स्नानगृहाचीही गैरसोय आणि हरवत चाललेल्या संवेदनशीलतेमुळे निवडणूक प्रक्रि येदरम्यानची वाढलेली आक्रमकता असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नसतात. त्याचप्रमाणे या समस्यांचा सामना करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मतदान पेट्या जमा करताना करावी लागणारी प्रतीक्षा आणि ऐनवेळी पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया यामुळे कर्मचारी त्रस्त होत असल्याने निवडणुकीची जबाबदारीच नको, अशी भावना बळावत असल्याचे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.