पाणी बंदमुळे ‘पंचवटीकरांची’ गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 11:47 PM2016-02-27T23:47:58+5:302016-02-27T23:58:44+5:30
नागरिकांनी केला पाण्याचा साठा : टँकरची व्यवस्था करण्याची मागणी
पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याच्या कारणावरून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज संपूर्ण पंचवटी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवल्याने पंचवटीकरांची गैरसोय झाली. नळाला पाणी आलेच नसल्याने नागरिकांनी जरा जपूनच पाणी वापरले. विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याने काही लोकप्रतिनिधींनी ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, त्याभागात बुधवारीच स्वखर्चाने पाण्याचे टॅँकर पाठविण्याची व्यवस्था केली होती.
पंचवटीत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी बुधवारच्या दिवशी घरातील हंडा, कळशी, मोठे पिंप, प्लास्टिक टब पाण्याने भरून ठेवले होते. पंचवटीतील हिरावाडीरोड तसेच हिरावाडी परिसरात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने हिरावाडीत गुरुवारी गुंजाळबाबानगर, भगवतीनगर व शिवकृपानगर या भागात खासगी टॅँकरने पाणीपुरवठा केल्याचे नगरसेवक रूची कुंभारकर यांनी सांगितले, तर हिरावाडीरोडवरील दामोदरनगर भागात बुधवारीच पाण्याचे टॅँकर पाठवून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे नगरसेवक समाधान जाधव, रूपाली गावंड यांनी सांगितले.
गुरुवारच्या दिवशी संपूर्ण पंचवटीत पाणीपुरवठा होणार नसल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी जरा जपूनच वापरले. कामानिमित्ताने सकाळच्यावेळी घराबाहेर पडलेल्या नोकरदार गृिहणींची तसेच मोलमजुरांची गैरसोय निर्माण झाली होती.
बुधवारीच पाण्याचा साठा करून ठेवला असला तरी दोन दिवस पाणी पुरविणे शक्य न झाल्याने काहींनी उसनवार म्हणून शेजारी राहणाऱ्यांकडूनही हंडाभर पिण्याचे पाणी घेतल्याचे बोलून दाखविले. (वार्ताहर)