हॉटेल्सची वेळमर्यादा गैरसोयीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:26 PM2020-10-06T23:26:02+5:302020-10-07T01:06:38+5:30
येवला : गेली सहा महिने बंद असलेली हॉटेल्स , रेस्टॉरंट, बार उघडले असले तरी हॉटेल्स खुले ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ...
येवला : गेली सहा महिने बंद असलेली हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार उघडले असले तरी हॉटेल्स खुले ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ७ वाजेची वेळ गैरसोयीची असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सदर वेळ रात्री १० वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी होत आहे.
येवला शहर परिसरात सुमारे शे-दीडशे छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. कोरोनामुळे गावी गेलेली या व्यवसायातील कारागीर मंडळी अजूनही परतलेली नसल्याने कारागीर टंचाई जशी आहे तशीच ग्राहक टंचाईही जाणवत आहे.
प्रमुख काही हॉटेल व्यवसायीकांनी शासन अटी, नियमांचे पालन करत व्यवसाय सुरू करतांना खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर काही हॉटेल्स कोरोना काळात बंद पडली. ती अद्यापही बंदच आहेत. कोरोनाची बाधितांची वाढती संख्या पाहता लोक पहिल्यासारखे हॉटेलिंगसाठी घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यातच व्यावसायिकांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ देण्यात आल्याने त्याचाही फटका बसतो आहे. हॉटेलमध्ये सायंकाळी ७ वाजेनंतरच ग्राहक यायला सुरूवात होते. त्यावेळीच हॉटेल्स बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, मास्क, सॅनीटायजर, सोशल डिस्टन्स या नियमांचे पालन करत हॉटेल व्यवसायीकांना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले. नेहमीच्या तुलनेत ग्राहकांचा प्रतिसाद अवघा दहा-पंधरा टक्के आहे. कोरोनामुळे मेनू कार्डमध्येही बदल झाले असून पदार्थांच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. बहुतांश हॉटेल व्यवसायिकांनी डिस्पोजल साहित्याचा वापर सुरू केला आहे.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत दिलेली वेळच मुळात चुकीची आहे. कारण हॉटेलमध्ये सायंकाळी ७ वाजेनंतरच ग्राहक येतात. त्यामुळे व्यवसाय होणार कसा? शासनाने हॉटेल व्यवसायीकांसाठी रात्री १० वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यायला हवा.
- योगेश तक्ते, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन, येवला.
शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच आहे. लॉकडाऊन काळात घरात राहण्याची आणि घरातीलच पदार्थ खाण्याची सर्वांनाच सवय लागली आहे. आता हॉटेल खुले झाले असले तरी कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे वा खाण्याची भिती वाटते.
- सुरेखा जाधव, ग्राहक, येवले.