कांदा लागवड क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 10:47 PM2019-12-23T22:47:03+5:302019-12-23T22:47:56+5:30
येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला. शेतातील नगदी पिके, मका, सोयाबीन, बाजरी, पोळ कांदा व कांदा रोपांचे नुकसान झाले. आशाही परिस्थितीत ओल्या दुष्काळाचे दु:ख बाजूला सारून शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या विक्रमी बाजारभावामुळे कांदा लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.
पाटोदा : सतत दुष्काळाशी सामना करणाऱ्या येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला. शेतातील नगदी पिके, मका, सोयाबीन, बाजरी, पोळ कांदा व कांदा रोपांचे नुकसान झाले. आशाही परिस्थितीत ओल्या दुष्काळाचे दु:ख बाजूला सारून शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या विक्रमी बाजारभावामुळे कांदा लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. येवला तालुक्यात रब्बी व उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र हे दहा हजार हेक्टर आहे. मात्र आजमितीस २१,५७८ हेक्टर आशा विक्रमी क्षेत्रावर कांदा लागवड झालेली असून, येत्या महिनाभरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गतवर्षाच्या तुलनेत गव्हाचा पेरा तिपटीने वाढला आहे. हरभरा पिकाची लागवड गत वर्षाच्या तुलनेत दुपटीने, तर ज्वारीचा पेरा निम्याने घटला असून, मका पिकाला शेतकºयांनी टाटा केला आहे. तालुक्यात रब्बी मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हेक्टर आहे मात्र आजमितीस मकाचा पेरा निरंक आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे तसेच रोपांचे नुकसान झाल्याने खरीप हंगामातील कांदा पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच पालखेड कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने बंधारे, तलाव भरल्याने तसेच विहिरी व बोअरवेल्स यांना पाणी उतरल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
हवामानबदलाचा रब्बीला धोका
येवला तालुक्यात गेल्या महिनाभरापासून ढगाळ वातावरण तसेच धुके व दव पडत असल्यामुळे गव्हावर तांबेरा, हरभरा पिकावर मावा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसाने हिरावला तर रब्बी हंगामावर रोगाचे सावट पसरले आहे. रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरीवर्ग महागडी औषधांची फवारणी करीत आहे; मात्र वातारणात सतत बदल होत असल्याने रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच असल्याने शेतकºयांच्या रब्बी हंगामाबाबतच्या आशा धूसर झाल्या आहेत.
ज्वारीचा पेरा तिपटीने घटला
येवला तालुक्यात रब्बी हंगामातील तृणधान्य, कडधान्य, तेलपीक या पिकांसाठी ९७९० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, ७२७४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर गत वर्षीच्या तुलनेत अडीचपट वाढ झाली आहे. मागील वर्षी फक्त ३०४२.५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी दिली आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीयोग्य ८२४ हेक्टर १५४ हेक्टर क्षेत्रावर सरासरी १९ पेरणी झाली आहे. गतवर्षी तुलनेत ज्वारीचा पेरा तिपटीने घटला आहे. मागील वर्षी ५११.५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ५५४८ हेक्टर असून, मागील वर्षाच्या तुलनेत चार पट वाढ झाली आहे.
येवला तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी कांदा उन्हाळ कांद्यापाठोपाठ गहू व हरभरा क्षेत्रातही वाढ झाली आहे. शेतकरीवर्ग एकच पीक घेत असल्याने सर्व माल बाजारात एकाच वेळी विक्र ीला येत असून, शेतकºयांना आपला शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरीवर्गाने पर्यायी पिकांची लागवड केल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.
- कारभारी नवले,
कृषी अधिकारी, येवला