आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:27 PM2020-03-28T16:27:26+5:302020-03-28T16:29:12+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : लॉकडाऊनमुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदीसाठी जादा दर मोजावे लागत असून, दर मोजूनही पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कमालिचे घसरले आहेत. परिणामी बाजारभाव घसरल्याने दळणवळणाचा खर्च सुटत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी विक्रीला आणलेल्या पालेभाज्या बाजारसमितीत फेकून घराकडे काढता पाय घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी शहरी भागात तथा बाजार समितीत विक्रीसाठी न आणणेच पसंत केले होते. परिणामी शहरी भागात भाजीपाल्याचे दर आकाशाल भिडले होते. त्यामुळे शासनाने भाजीपाला शहरी भागात विक्रीसाठी शेतक-यांना अनुमती दिल्याने गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांच्या कालावधीत नाशिक बाजार समितीत शेतमालाची प्रचंड आवक झाली. बाजारसमितीचा आवार शेतमालाने पुर्णपणे भरगच्च झाला होता. मात्र आवक वाढल्याने साहजिकच भाजीपाल्याचे दर कोसळले. परिणामी भाजीपाला काढणी व वाहतुकीचा खर्चही न सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी काही शेतक-यांनी कोथिंबीर, मेथी तसेच शेपूच्या जुड्या बाजारसमितीच्या आवारातच फेकून काढता पाय घेतला.