कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:24 AM2021-02-18T04:24:47+5:302021-02-18T04:24:47+5:30
सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ ...
सिन्नर : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १५ दिवसात शहर व तालुक्यात ५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सिन्नर ग्रामीण रुग्णालय आणि इंडिया बुल्स कोविड सेंटर या दोन ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, गेल्या महिन्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने इंडिया बुल्स कोविड सेंटरला रुग्ण नव्हते. केवळ शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र, गेल्या १५ दिवसात ५९ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर गेल्या दोन दिवसात १४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात ३९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिन्नर शहर व तालुक्यात आत्तापर्यंत ३ हजार ९९५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ३ हजार ८३८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर कोरोनामुळे सिन्नर तालुक्यात आत्तापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला असून, ५५ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क किंवा रुमालाचा वापर करण्यासह वेळोवेळी हात धुण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
इन्फो
आजपासून स्वॅब घेणार
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढल्याने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब देण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यामुळे आता गुरुवार (दि. १८)पासून इंडिया बुल्स येथील कोविड रुग्णालयात नवीन संशयित रुग्णांचे स्वॅब संकलन केले जाणार असल्याची माहिती डॉ. लहू पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.