सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ
By Admin | Published: September 6, 2014 10:13 PM2014-09-06T22:13:01+5:302014-09-07T00:13:03+5:30
सिन्नरच्या पूर्व भागात कापूस क्षेत्रात वाढ
सिन्नर : तालुक्यात तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यातही पश्चिम भागात चांगला पाऊस, तर पूर्व भागात केवळ रिमझिम पाऊस झाला. उशिराच्या पावसामुळे कमी पाण्यावर तग धरून येणारे मूळ मराठवाड्यातील असेलेले कापूस पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात वाढ झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना यंदा कडधान्य पिकांना मुकावे लागणार असल्याचे चिन्ह आहे.
तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अद्याप या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र सुमारे ५० टक्क्यांच्या जवळपास पेरण्या झाल्या आहेत. रिमझिम पावसावर ही पिके तरारली आहे. मात्र अधिक पाणी लागणाऱ्या पिकांपेक्षा कमी पाण्यावर तग धरून राहणाऱ्या कापूस पिकाच्या पेरणीचे उद्दिष्ट एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ठेवण्यात आले होते किंबहुना त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पूर्वभागात कपाशीचे क्षेत्र वाढले असून, कडधान्य, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. खरीप हंगामातील तृणधान्य पिकांमधील बाजरी, मका, खरीप ज्वारी व नागली यौपकी बाजरी व मका पिकांची पेरणी १५ ते २० जुलै कालावधीपर्यंत करणे आवश्यक होते. मात्र या पिकांच्या लागवडीलाही उशीर झाला आहे. मात्र ही पिके सध्या चांगली आली असून, त्यांना खतांची गरज आहे. मात्र खते मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे.
सपाटून पाऊस झाल्यास भाजीपालावर्गीय व नगदी पिकांतून उत्पादन वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्व भागातील सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे असल्याने यापुढेही पावसामध्ये सातत्य राहिले तरच या पिकांचे उत्पादन हाती लागेल अन्यथा यंदाचा खरीप हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाप्रमाणे यंदा तृणधान्य पिकांतील बाजरी पिकाच्या पेरणीचा २० हजार २५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असून, मका १९ हजार २५०, सोयाबीन-आठ हजार क्षेत्राचे उद्दिष्ट होते. तथापि, या पिकांची पेरणी १५ ते २० जुलैपर्यंत झाली असती तर हे उद्दिष्ट पूर्ण झाले असते. मात्र पेरणी उशिरा झाल्याने उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र भूईमुग- चार हजार १५०, खरीप ज्वारी ५०० हेक्टर, नागली ५० उद्दिष्ट गाठू शकण्याची शक्यता आहे. परंतु कडधान्य वर्गातील तूर, मूग, मठ व कुळीद यांचे प्रत्येकी एक हजार ५०० हेक्टर तर सूर्यफूल, खुरासणी या तेलबिया वर्गातील पिकंचे प्रत्येकी १०० हेक्टर, ऊस- ८५० हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट होते. त्यापैकी कडधान्य वर्गातील पिकांची लागवड अत्यल्प क्षेत्रावरच झाली आहे. (वार्ताहर)