सिडको, अंबड भागात गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:56 AM2019-07-25T00:56:09+5:302019-07-25T00:56:27+5:30
गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सिडकोतील मुख्य चौक, उद्यान, शाळा तसेच मोकळ्या जागा असलेल्या भागात रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरू आहे.
सिडको : गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. सिडकोतील मुख्य चौक, उद्यान, शाळा तसेच मोकळ्या जागा असलेल्या भागात रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरू आहे. महाविद्यालयाच्या बाहेर तसेच शाळेच्या आवारात विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास घडत असून, यामुळे तरुणी, महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या खाकीचा धाक कमी झाला का असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या खाकीचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात सजा भोगत असलेले बहुतांशी गुन्हेगार हे सध्या जामिनावर बाहेर आले असून, यातील काहींना पोलिसांनी तडीपार केले असले तरी अनेक गुन्हेगार सर्रासपणे सिडको तसेच अंबड भागात सध्या राजरोस वावरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे साहजिकच त्यांचा मित्रपरिवारदेखील यामुळे अधिक फार्मात आला असून शाळा, महाविद्यालय परिसरात दररोज विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थिनींमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिडको भागातील मोकळ्या जागा तसेच उद्यानांमध्ये तसेच शाळा व महाविद्यालयांच्या आवाराचा ताबा या गुंडांनी तसेच मद्यपींनी घेतला असून, नागरीवस्तीतदेखील त्यांची दहशत असल्याने काही नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनादेखील धमकाविण्याचे प्रकार घडत असल्याने कोणीही नागरिक भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नाही.
शाळांचे मैदान बनले मद्यपी, गुन्हेगारांचे अड्डे
गणेश चौक येथील हनुमान मंदिर परिसर, तुळजाभवानी चौकातील सिद्धिविनायक गार्डन, सिध्देश्वर चौक, स्टेट बॅँक परिसर तसेच सर्व मद्यविक्रीची दुकाने आणि सर्व शाळा व महाविद्यालयत परिसर त्याचबरोबर सर्व क्लासेस परिसर, उपेंद्रनगर, अंबड, राजरत्ननगर, उत्तमनगर महाविद्यालय परिसर, शिवपुरी चौक, शुभम पार्क, पवननगर मटण मार्केट परिसर, पवननगर येथील मैदान यांसह अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको व अंबड परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचा वावर वाढला असून, याबाबत पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नसल्याने सिडको भागातील मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्टेट बॅँक चौपाटीवर चटपटीत पदार्थ खाण्यासाठी सिडको तसेच परिसरातील नागरिक हे कुटुंबासह येत असून यातील काही खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर चक्क मद्य पिण्याचे प्रकार घडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. चौपाटी तसेच मोकळ्या जागा व उद्यानांच्या परिसरात सर्रासपणे मद्य सेवन करून अनेकदा परिसरात दहशत पसरविण्याचे प्रकार गुन्हेगारांकडून केले जात आहेत.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलीस चौक्या फक्त नावापुरत्या उरल्या असून, याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीसच नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. बंद असलेल्या चौक्या सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.