व्हर्च्युअल करन्सी संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Published: May 26, 2017 12:28 AM2017-05-26T00:28:16+5:302017-05-26T00:28:26+5:30
आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने नोंदणी फॉर्म भरून घेणाऱ्या पाच संशयितांच्या पोलीस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी एक दिवसाने वाढ केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करून त्यामध्ये बिट क्वाइन या बेकायदेशीर व्हर्च्युअल करन्सीच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या कमिशनचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने नोंदणी फॉर्म भरून घेणाऱ्या विदेशी नागरिकासह पाच संशयितांच्या पोलीस कोठडीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस़ एम़ बुक्के यांनी बुधवारी (दि़ २४) एक दिवसाने वाढ केली़ तर टूरिस्ट व्हिसावर येऊन बिट क्वाईनची मार्केटिंग करणारे रोमजी बिन अहमद या संशयिताविरोधात पोलिसांनी फॉरेनर्स अॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़
भारतात कायदेशीर चलन म्हणून अधिकृत मान्यता नसलेली बिट क्वाइन या व्हर्च्युअल करन्सीची खरेदी-विक्री केल्यास भविष्यात मोठ्या रकमेच्या परताव्याचे कमिशन व फायदे यांचे आमिष दाखवून नाशिक शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये जानेवारी २०१७ पासून नागरिकांसाठी सेमिनार घेण्यात आले़ तसेच मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना बिट क्वाइन खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणे, सभासद नोंदणी फॉर्म भरून घेणे, स्टिकर्स, माहिती पत्रक, बोनस फॉर्म,
लोगो तयार करून तो खरा आहे असे भासवून नागरिकांची फसवणूक केल्याची फिर्यादी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे़याप्रकरणी सायबर पोलिसांनी संशयित निशेद महादेव वासनिक (१९, रा़ वसिक प्राइड सोसायटी, आराधनानगर, दिघोरी-खर्बी रोड, नागपूर), रोमजी बिन अहमद (४७, रा़ जलान ईदाह-२, तमन सेताजी ईदाह, सुनगाई पेतानी, केदाह, मलेशिया), आशिष शंकर शहारे (रा़ गोरावती रेसिडेन्सी, कोपरगाव, जि़ अहमदनगर), दिलीप प्रेमदास बनसोड (२९, रा़ फाळके प्राईड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) कुलदीप लखू देसले (३८, रा़ सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) तसेच फ्यूचर बिटकॉम व त्यांच्या इतर सहकारी कंपनी व संचालक यांच्यावर चिट्स अॅण्ड मनी सर्क्युलेशन स्किम्स (बॅनिंग) अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़