डेंग्यूमुळे रक्तबिंबिकांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:42 PM2018-10-17T17:42:11+5:302018-10-17T17:42:31+5:30
रक्तपेढ्यांमध्ये वर्दळ : शिबिरांच्या माध्यमातून संकलन
नाशिक - गेल्या तीन-चार वर्षांपासून डेंग्यूच्या आजाराने शहराला पछाडले असून दिवसेंदिवस डेंग्यू संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. डेंगी तापामुळे शरीरातील प्लेटलेटस् अर्थात रक्तबिंबिंकांचे प्रमाण कमी होत असल्याने प्लेटलेटस्ला रक्तपेढ्यांतून मागणी वाढत आहे. त्या तुलनेत वेळेत पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी रक्तपेढ्यांकडून शिबिरांवर अधिकाधिक भर दिला जात आहे.
डेंग्यूने नाशिककरांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात आढळून येत असल्याने नाशिक महापालिकेने घरोघरी जाऊन पाणी साठे तपासणी मोहीम सुरू केली असतानाच लोकांचे प्रबोधनही केले जात आहे. डेंगीचे डास हे प्रामुख्याने फ्रीज, कुंड्या, पाण्याच्या टाक्या यामध्ये आढळून येत असल्याने सदर पाणी नष्ट करण्याची मोहीम राबविली जात आहे. शहरातील बव्हंशी खासगी व शासकीय तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण उपचार घेताना दिसून येत आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे. त्यातच रक्तस्त्रावाचा ताप असल्यास रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेटस् अर्थात रक्तबिंबिंकांचे प्रमाण कमालीचे घटते. त्यातून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात प्लेटलेटस्चे प्रमाण वाढविण्यासाठी रक्तपेढ्यांकढडे प्लेटलेटस्ची मागणी केली जाते. त्यात रॅँडम डोनर प्लेटलेटस्च्या माध्यमातून ५ ते ७ हजार प्लेटलेटस् वाढतात तर सिंगल डोनर प्लेटलेटस्च्या माध्यमातून ५० हजार प्लेटलेटसने वाढ होते. प्लेटलेटसचा साठा हा पाच दिवसांच्यावर टिकू शकत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांना शिबिरांच्या माध्यमातून त्याच्या संकलनावर भर द्यावा लागत आहे. रक्तपेढ्यांमध्ये सद्यस्थितीत प्लेटलेटसच्याच रक्तपिशव्यांना जादा मागणी असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे सिंगल डोनर प्लेटलेटस्च्या ५ ते ७ आणि रॅँडम डोनर प्लेटलेटस्च्या किमान ३० ते ४० रक्तपिशव्या प्रत्येक रक्तपेढ्यांतून वितरित होत आहेत. प्लेटलेटस्च्या रक्तपिशव्यांची किंमतही परवडणारी नसल्याने सामान्य रुग्णांची मात्र आर्थिक परवड होत असते.
प्लेटलेटस्ला मागणी
शहरात डेंग्यूची साथ असल्याने सध्या प्लेटलेटस्ला मागणी वाढली आहे. प्लेटलेटस् या पाच दिवसांपर्यंत टिकतात. त्यामुळे त्यांचा अधिक काळ साठा करून ठेवता येत नाही. परिणामी, वारंवार रक्तदान शिबिरे घ्यावी लागतात.
- डॉ. एन. के. तातेड, अर्पण रक्तपेढी
१३० रक्तपिशव्या जमा
नाशिक शहरात डेंग्यूची साथ सुरू असल्याने रक्ताला मागणी वाढली आहे. त्यामुळे आमच्या गोंदे येथील पेलिकन आॅटोमोटिव्ह आणि प्रमोशन प्रॉडक्ट कंपनीने खास प्लेटलेटस्साठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात १३० रक्तपिशव्या जमा झाल्या.
- रवीकिरण मोरे, प्रशासकीय अधिकारी