मालेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:11 AM2018-03-24T00:11:53+5:302018-03-24T00:11:53+5:30

मालेगाव शहर व परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक टोप्या, उपरणे, गॉगलचा वापर करताना दिसून येत आहे.

 Increase in heat intensity in Malegaon area | मालेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ

मालेगाव परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ

Next

संगमेश्वर : मालेगाव शहर व परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक टोप्या, उपरणे, गॉगलचा वापर करताना दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षाचा हंगाम सुरू असून, उन्हाच्या झळा सहन करत शालेय विद्यार्थी वर्गांना उपस्थिती दाखवित आहेत. काही प्राथमिक शाळांनी दुपारचे सत्र बंद करून सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व युवती तोंडाला, डोक्याला स्कार्फ बांधून मार्गक्रमण करताना दिसत आहेत. दुपारच्या वेळेत रस्ते ओसाड पडल्या सारखे वाटत आहे. उन्हाच्या तीव्रतेतून सुटका करण्यासाठी नागरिकांनी गॉगल, उपरणे यांना पसंती दिल्याने शहरात विविध आकर्षक टोप्या, उपरणे तसेच गॉगलची दुकाने जागोजागी थाटली आहेत. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी या वस्तू खरेदी करीत आहेत.  उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंडपेये, उसाचा रस, नारळपाणी, आईस्क्रीम घेत आहेत. शहरभर जागोजागी थंडपेये विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्था, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी ठिकठिकाणी पाणपोयीची व्यवस्था केली आहे. थंड पाणी मिळत असल्याने वाटसरूंना दिलासा मिळत असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हवामान बदलामुळे रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. ताप येणे, डोकेदुखी, खोकला, घसादुखीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. थंडपेय घेऊ नये वा काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर मंडळींनी केले आहे.

Web Title:  Increase in heat intensity in Malegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.