पांगरी परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:48 PM2019-04-01T17:48:22+5:302019-04-01T17:49:09+5:30
पांगरी : परिसरात उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तपमान वाढल्यामुळे उन्हाची तीव्रता मागील महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चटका देणारे उन असल्याने लोक उन्हात जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट जाणवतो. दिवसेंदिवस तपमान वाढत असल्याने उर्वरित उन्हाळा कसा जाणार या विचाराने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पांगरी व परिसरात नेहमीच पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच यावर्षीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बंधारे कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांची टँकरद्वारे तर गावातील काही भागातील नागरिकांची तहान मनेगावसह १६ गाव नळ पाणीपुरवठा योजनेवर तर उर्वरित गावातील नागरिकांची तहान डांबर नाला येथून असलेले राष्ट्रीय पेयजल योजनेवर भागविण्यात येत आहे. जनावरांचा चार-पाण्याचा प्रश्न गंभीर असून, परिसरातला हिरवा चारा संपला असून यापुढे वैरण व खाद्य जनावरांना द्यावे लागणारा आहे. त्यामुळे दुध उत्पादनात घट दिसून येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत असताना शेतीच्या पाण्यासाठीचेही चित्र वेगळे नाही. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिली तर डाळींब उत्पादकांना व कुक्कुटपालन व्यावसायिकांना खासगी टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागणार आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ टोप्या व उपरण्याचा वापर करू लागले आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाही लाही होत आहे. ‘गरीबांचा फ्रीज’ समजला जाणारा माठ, रांजणास मागणी वाढली आहे. तसेच सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रसवंतीगृहे व शीतपेयांची दुकाने थाटली असून रसाबरोबर विविध कंपन्यांची शीतपेय, दही, लस्सी व ताक यांनाही मागणी वाढली आहे.