कोरोनाबाधित संख्येत ८ ने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 01:39 AM2022-06-06T01:39:16+5:302022-06-06T01:39:34+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली असून रविवारी एकूण ८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यात ४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील तर प्रत्येकी २ रुग्ण नाशिक ग्रामीण आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली असून रविवारी एकूण ८ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. त्यात ४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील तर प्रत्येकी २ रुग्ण नाशिक ग्रामीण आणि मालेगाव मनपा क्षेत्रातील आहेत.
गत तीन महिने सातत्याने केवळ एक-दोन किंवा रुग्ण वाढच नसण्याच्या काळानंतर रविवारी तब्बल ८ नवीन रुग्ण वाढले आहेत. राज्यात एकीकडे रुग्ण वाढीने वेग पकडला असतानाच नाशिकमध्येदेखील कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसू लागली आहे. त्यातही नाशिक शहरातच अधिक वाढ दिसत असल्याचे रविवारच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यापूर्वी चार दिवसांपूर्वी अचानकपणे झालेल्या रुग्ण वाढीत गतवर्षी साईटवर अपलोड न केलेल्या चार बाधितांचा समावेश होता. त्यामुळे मोठा आकडा दिसला असला तरी आता रविवारी कोरोना बाधितांच्या संख्येने पुन्हा दुहेरी आकड्याच्या दिशेने कूच केल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी संख्येत पुन्हा वाढ हाेऊन ती ३० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील १६, नाशिक ग्रामीणचे ६, मालेगाव मनपाचे ५ तर जिल्हाबाह्य ३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट पुन्हा १.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात नाशिक मनपाचे २.१९ टक्के, नाशिक ग्रामीण ०.६३ टक्के असे प्रमाण आहे. तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के झाले आहे.