मेशीसह परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:28+5:302021-04-26T04:13:28+5:30
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट ...
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. मेशीसह संपूर्ण देवळा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सगळ्यांनी घरातच राहणे पसंत केले आहे. सध्या कडक उन्हाने लाहीलाही होत असतानादेखील शेतीची कामे उरकण्यात शेतकरी व्यस्त आहेत. सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिराने कामे आटोपण्यावर भर दिला जात आहे. ऊन आणि कोरोना संक्रमण यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय बऱ्याच बाजार समित्या सध्या बंद आहेत. या कारणाने शेतमाल विकणे बंदच आहे. शेतमाल साठवणुकीवर भर दिला जात असून घरच्या घरीच कामे करावी लागत आहेत. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असून उन्हाचे चटकेही जाणवत आहेत.
सध्या आठवडे बाजार, लग्नसराई, सण-उत्सव सर्वच बंद असल्यामुळे गावे ओस पडली आहेत. सर्व जण आपापल्या तब्येतीची काळजी घेऊन इतरांच्या तब्येतीची मोबाइलद्वारे विचारपूस करताना दिसत आहेत.