रेल्वे प्रवाशांच्या मोबाइल चोरीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:25+5:302021-02-09T04:17:25+5:30
रेल्वेस्थानक व रेल्वेच्या प्रवासा दरम्यान चोरीच्या लुटीच्या घटना नेहमीच घडत असतात. गेल्या पाच वर्षांपासून गुन्हे वाढण्याचे प्रमाण दरवर्षी वाढतच ...
रेल्वेस्थानक व रेल्वेच्या प्रवासा दरम्यान चोरीच्या लुटीच्या घटना नेहमीच घडत असतात. गेल्या पाच वर्षांपासून गुन्हे वाढण्याचे प्रमाण दरवर्षी वाढतच चालले आहे. नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द लहवितपासून कसबेसुकेणापर्यंत आहे. नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात २०१६ यावर्षी २०७, सन २०१७ मध्ये ३९५, सन २०१८ मध्ये ५३५, २०१९ यावर्षी ४४४ गुन्हे दाखल झाले होते. २०२० मध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच कोरोना संसर्ग रोगामुळे चार महिने रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा बंद होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येत आहे. दरम्यानच्या काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे सर्व प्रवेशद्वार बंद करून एकमेव मुख्य प्रवेशद्वार येण्या-जाण्यासाठी सुरू आहे. ज्याच्याकडे रेल्वे तिकीट आरक्षण आहे त्यालाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. अशा सर्व कडेकोट परिस्थितीमुळे २०२० यावर्षी फक्त ११४ गुन्ह्यांची नोंद रेल्वे पोलिसांकडे झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पुन्हा रेल्वे सुरू करण्यात येत आहे. तशी रेल्वेची संख्या वाढत आहे, तशीच गुन्ह्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची नोंद संबंधित प्रवाशाने पुढे ज्या ठिकाणी लक्षात आले त्या रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे. त्या पोलीस ठाण्याकडून अद्याप ऑनलाइन गुन्हे नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेले नाही.
चौकट=====
नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांचे प्रमाण मोबाइल चोरीचे आहेत. प्रवासादरम्यान प्रवासी झोपलेला असल्यास किंवा मोबाइल चार्जिंगला लावला असल्यास मोबाइल चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. चोरलेले मोबाइल अत्यंत नगण्य किमतीत विक्री होत असल्याने व चोरट्यांना ग्राहकदेखील कमी किमतीमुळे लागलीच मिळत असल्याने चोरट्यांनी मोबाइल चोरीला टार्गेट केले आहे.