घरातील तरुणांमुळेच ज्येष्ठांसह बालकांच्या बाधित प्रमाणात वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:40+5:302021-04-13T04:13:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काेरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग हा प्रामुख्याने घरांतील ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक व्हायचा. त्यावेळी बालकांना किंवा संसर्ग झाल्याचे प्रकार अल्प आणि कोरोनाला बळी पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, गत लाटेच्या अनुभवातून बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाचा विचार करुन आता घरांमध्येच थांबणे पसंत केले आहे. तरीदेखील दुसऱ्या कोरोना लाटेत लहान मुलांना आणि ज्येष्ठांना संसर्गाची लक्षणे आढळण्याच्या प्रमाणात मोठीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कामधंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या २५ ते ५० वयोगटातील कमावत्या तरुण व्यक्तींमुळेच हा संसर्ग वाढत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गतवर्षी डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ वर्षाखालील लहान मुलांना ताप, घसादुखी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळली असली, तरी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक बालकांना कोरोना झाला तरी त्यातील बहुतांश बालकांना ॲडमिट करावे लागले नव्हते. त्यामुळे ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, केवळ त्या घरांमधील बालकांमध्येच प्रामुख्याने आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले होते. त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांचा मोठा समावेश होता. त्याशिवाय मुलांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळण्याचा पॅटर्न दिसून आला होता. अनेक बालकांमध्ये बारीकसा ताप, थोडेसे गरगरणे, खोकला व घसादुखी अशी सौम्य लक्षणे होती. नव्या कोरोना व्हायरस संबंधात जे संशोधन नव्याने पुढे आले त्यात असे आढळले की तरुणांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी असले तरी याआधीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असू शकते. गतवर्षी मोठ्या अर्थात १५ वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधितांची संख्या १६,६१२ इतकी होती. त्यात गत तीन महिन्यात तब्बल १० हजारांहून अधिक भर पडली असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो
६० वर्षांवरील बाधितांचे प्रमाण ४० टक्क्यांवर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये एकूण बाधित संख्येपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक वयोगटातील आहेत. त्यातील अनेक रुग्ण हे स्वत: कोणत्याही कामासाठी किंवा खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नव्हते. तरीदेखील त्यांना कोरोना झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना बाधा होण्यामागे घरातून उदरनिर्वाहासाठी बाहेर पडणाऱ्यांना झालेली बाधा हेच कारण असल्याचे बहुतांश प्रकरणांमध्ये दिसून येत आहे.
इन्फो
बाहेरुन घरी आल्यानंतर पूर्ण स्वच्छता
बहुतांश नागरिकांना पोटपाण्याच्या कामधंद्यासाठी घराबाहेर जावेच लागत आहे. अशा परिस्थितीत घरी आल्यानंतर किमान हे पूर्ण वर्षभर नागरिकांनी आल्यावर स्वत:चे सर्व कपडे धुवायला टाकून, बादलीभर पाण्याने स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याकडील मोबाइल, किचेन यासारख्या वस्तूदेखील सॅनिटाईज करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्यांनी कुटुंबासमवेत एका खोलीत झोपणेदेखील टाळण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
----------------