ठाणगाव येथे डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:09+5:302021-07-02T04:11:09+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असून, ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून या ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असून, ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून या आजारावर नियंत्रण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगावमध्ये कोरोना या आजारावर नियंत्रण मिळविल्यानंतर आता नव्याने डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे नागरिकांना सुरुवातीस जुलाब उलट्या होत होत्या. त्यानंतर ताप येण्याचे प्रमाणही वाढल्याने अनेक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता खासगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेत आहेत. सरकारी दवाखान्यात डेंग्यूची चाचणी केल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान तीन-चार दिवस थांबवावे लागते. त्यामुळे अनेकांनी खासगी दवाखान्याचा रस्ता धरला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात पाणी साठत असणाऱ्या जागेवर जंतुनाशक औषधाची फवारणी वेळोवेळी करावी म्हणजे स्वच्छ पाण्यावर तयार झालेले डेंग्यूचे डास नामशेष होऊन रुग्णसंख्येत वाढ होणार नाही. ठाणगावमधील कोळीवाडा, ग्रामपंचायत परिसर व बस स्टॅण्ड परिसरात ताप असणारे रुग्ण अधिक असून, या भागात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
------
डेंग्यू होण्याचा धोका
डेंग्यू आजाराचे तीन प्रकार असून, हा आजार स्वच्छ पाणी जास्त दिवस साठवून ठेवलेल्या भांड्यामध्ये तयार होते. जास्त दिवसाचे स्वच्छ पाण्यावर डास तयार होऊन तो डास जर मानवास चावला तर त्यापासून डेंग्यू होण्याचा धोका अधिक असल्याने साठवून ठेवलेला पाण्यामध्ये आबेटींग नावाचे औषध टाकले तर त्या साठवलेल्या स्वच्छ पाण्यात तयार झालेल्या डास व अळी नामशेष होऊन जातात. तेव्हा आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा दिवस पाळणे यासाठी गरजेचे आहे. ग्रामस्थांनी आपल्या घरामध्ये जास्त पाण्याची साठवणूक करून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाणी ओतून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ठाणगावचे वैद्यकीय अधिकारी आर. डी. धादवड यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने ठाणगाव ग्रामपंचायतीस नोटीस बजावण्यात आली असून, त्यामध्ये डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होऊ नये यासाठी काही उपाययोजना ग्रामपंचायतीने राबवणे गरजेचे असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
-----------
फोटो ओळी- ठाणगाव आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यूसदृश आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना आरोग्यसेवक व आशासेविका. (०१ ठाणगाव)